अजित पवारांचे नातेवाईक म्हणून जर धाड टाकली असेल तर कुठल्या स्तरावर जाऊन राजकारण होतंय याचा जनतेने विचार करावा – अजित पवार

रोहित खर्गे
विभागीय संपादक
७ ऑक्टोबर २०२१

मुंबई

अजित पवारांचे नातेवाईक म्हणून जर धाड टाकली असेल तर कुठल्या स्तरावर जाऊन या वेगवेगळ्या संस्थांचा वापर केला जातोय त्यामुळे राज्यातील जनतेने या गोष्टीचा विचार जरूर केला पाहिजे असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मांडले.

आयकर विभागाने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या कंपन्यांवर धाडी टाकल्या आहेत. त्यावर पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न विचारला असता आयकर विभागाने धाडी टाकल्याचे वृत्त खरे आहे असे सांगितले.

आयकर विभागाने इतर कंपन्यांवर धाडी टाकल्या त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही ते त्यांना योग्य वाटेल ते करु शकतात परंतु ज्यांचा काही संबंध नाही त्यांच्यावर धाडी टाकल्या त्याचं वाईट वाटलं असेही अजित पवार म्हणाले.

अनेक सरकारे येत जात असतात शेवटी जनता सर्वस्व आहे. जनता योग्य निर्णय घेते. मागील निवडणुकीच्या अगोदर पवारसाहेबांचा बँकेशी संबंध नसतानाही ईडीने नोटीस काढले होते. त्यातून रामायण म्हणा किंवा राजकारण म्हणा घडलं आणि जनतेने बोध घेतला असे सूचक विधानही अजित पवार यांनी यावेळी केले.

आयकर विभागाने कुणावर छापेमारी करावी हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना शंका आली म्हणून त्यांनी छापेमारी केली. माझ्याशी संबंधित कंपन्यांवर छापेमारी झाली आहे. आम्ही दरवर्षी कर भरणारे आहोत कारण मी स्वतः अर्थमंत्री आहे. आर्थिक शिस्त कशी लावायची… कर चुकवायचा नाही… कर व्यवस्थितपणे कसा भरायचा हे मला माहीत आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

माझ्या संबंधित सर्व कंपन्यांचे कर व्यवस्थितपणे. वेळच्या वेळी भरले जातात. त्यात काही अडचण नाही. तरी मी म्हणून उपयोग नसतो. आता ही राजकीय हेतूने धाड टाकली की आयकर विभागाला आणखीन काही माहिती हवी होती ते आयकर विभागाच सांगू शकतील असेही अजित पवार म्हणाले.

माझ्या संबंधित कंपन्यांवर धाड टाकली त्यावर काही म्हणायचं नाही कारण मी एक नागरिक आहे. मात्र एका गोष्टीचं दु:ख आहे की, माझ्या बहिणी ज्यांची ४० वर्षापूर्वी लग्न झाली. सुखाने संसार करत मुलं आहेत त्यांची लग्न होवुन नातवंड आहेत. एक बहीण कोल्हापूर आणि दोन बहिणी पुण्यात आहेत त्यांच्यावर धाडी टाकल्या आहेत. याच्या पाठीमागचं कारण समजू शकलं नाही अशी शंकाही अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *