बेसूर कारभार होऊनही भाजप जोरात तर सूर सापडूनही अवसान गळालेली राष्ट्रवादी कोमात ?

रोहित खर्गे
विभागीय संपादक
५ ऑक्टोबर २०२१

पिंपरी 

अवघ्या चार महिन्यांवर निवडणूका येऊन ठेपल्या आहेत. भाजपचे भ्रष्टाचाराचे किस्सेही रंगू लागले आहेत. अगोदर आरोपांच्या फैरी झडत असे. हवेतच आरोपांचा गोळीबार होत असे, पण जाहिरात फलकाच्या एका ठेकेदाराकडून स्थायी समितीचे कारभारी  व पालिकेचे कर्मचारी लाच घेताना लाच प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याने रंगेहात पकडले. यात कोणाचा हात होता ?  ही बाब लवकरच समोर येईल. पण त्यानंतर विरोधकांनी रान उठवले. अगदी पालिकेत ‘नंदीबैल ‘ आणून आंदोलन केले. घसा कोरडा पडेपर्यंत आक्रोश केला. स्थायी समिती बरखास्त करा. असा नाराही दिला.  आम्ही आमच्या चारही सदस्यांना स्थायी च्या बैठकीत पाठवणार नाही अशा घोषणा आणि  वल्गनाही  झाल्या. भाजपचे स्थायी समिती कारभारी जेलमधून सुटून आले आणि परत येऊन स्थायी च्या बैठकाही  सुरू करून आर्थिक  कारभार हातात घेतला. विरोधात असलेल्या राष्ट्रवादी ला विचारले असता उलट घुमजाव करत सत्ताधारी किती निर्लज्ज आहेत असे आरोप करत त्यांच्याच मांडीला मांडी लावून विरोधात असलेले विरोधक सत्ताधाऱ्याच्या ” हा ला हा ” देत  स्थायीत दिसत आहेत. असे चित्र अगदी निवडणूक तोंडावर आल्या असताना दिसत आहे. म्हणजेच खरोखर विरोधकांना सत्ता हवी आहे? असा प्रश्न नागरिकांना पडतो.

कथित मूर्ती घोटाळा प्रकरणावरून त्यावेळी राष्ट्रवादी ला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले होते याचे उदाहरण समोर असतानाही आता एव्हडे मोठे भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण  समोर आले असताना त्याचे भांडवल न करता आक्रमकता बांधून ठेऊन फक्त ‘ तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो ‘ असेच चित्र सध्या पिंपरी चिंचवडकरांना पाहायला मिळत आहे. सध्यातरी सत्ता दूरच फक्त आपापले हित जोपासण्यात जो तो मुश्गुल आहे.  मग ते ठेकदारीत असो की आपले नगरसेवक पद अबाधित राहो यासाठी असो,  बने चाहे दुष्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा…असे सूर अळवतानाही काही नेते दिसत आहेत. म्हणजेच  सत्ताधार्यांना एव्हडे रान मोकळे आहे की भ्रष्टाचार करताना रंगेहात  पकडले गेले तरीही कोण्ही काही वाकडे करू शकत नाही याचा प्रत्ययच सत्ताधार्यांना आला आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न  काय आहेत याकडे लक्ष देण्यास विरोधकांना वेळच कुठे आहे. खरेतर नागरिकांच्या अनेक प्रश्नावर रान उठवून सत्ताधार्यांना कैचीत पकडून सत्तेवरून पायउतार करता येऊ शकेल एव्हडे मुद्दे आणि नागरिकांच्या समस्या आहेत पण त्यावर आवाज उठवणार कोण हाच प्रश्न आता नागरिक एकमेकांना विचारत आहेत. म्हणजेच सत्ताधारी एव्हडे होऊनही जोमात..तर विरोधी पक्षातील कार्यकर्ते कोमात..असेच चित्र सध्यातरी पाहायला मिळते.

येथील दोन्ही दिग्गज आमदार जे अगोदर राष्ट्रवादीचे च  होते त्यांची ताकद शहराला माहीत आहे. त्यामुळे ते त्यांचे काम येणाऱ्या काळात चोख बजावणार यात शंका घेण्याचे कारण नाही. जसजशी निवडणूक जवळ येईल तसतसे शह कटशहाचे  फासे ते दोघेही टाकत राहणार हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज पडणार नाही. नदीपलिकडून २५ ते ३०  आणि अलिकडून कितीही उलथापालथ झाली तरी २० ते २५  नगरसेवक निवडून आणण्याची ताकद या दोघांमध्ये आहे असे जाणकार सांगतात. म्हणजे परत सत्ता भाजपची च असेल असे आत्तातरी वाटते. पण जसजशी निवडणूक जवळ येईल तशा खूप घडामोडी घडतील.

राज्याच्या राजकारणात किरीट सोमय्या व देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी तीन पायाचे आघाडी सरकार ला ‘ सळो की पळो ‘ करून सोडले आहे. रोज काहीना काही आरोप आघाडी सरकारवर करत आहेत. त्याचा थोडा तरी धडा येथील विरोधात असलेले राजकारणी घेतील ? असा प्रश्न येथील नागरिकांना व जाणकारांना पडतो. सध्या तरी उपमुख्यमंत्री सगळ्या घडामोडींकडे लक्ष देऊन आहेत.  ते नुकत्याच एका  कार्यक्रमात सूचित करून गेलेत की  निवडणूका तोंडावर आल्या की बरेच नगरसेवक इलेक्टिव उमेदवार आमच्या तिकिटावर निवडणुका  लढवतील म्हणजे सत्ताधार्यांना वाटते तेव्हडे सोपे दिसत नाही. अजितदादा येते सत्ता आणण्यासाठी  काहीही करू शकतात. पण एकटा राजा काय करू शकतो हा गड काबीज करण्यासाठी येथील सेनापती आणि सैनिकांच्या मनात  असायला हवे. पण येणारा काळच सांगेल उपमुख्यमंत्री अजित पवार कोणत्या पद्धतीने पिंपरी चिंचवड त्यांच्या हक्काचा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी त्याच  सेनापतींच्या हाती  सूत्र देतात की नव्या दमाच्या नेत्यांना शहरात आणतात की स्वतःच सगळी सूत्रे हातात घेऊन वेगाने चक्रे फिरवुन राजकारणात काहीही होऊ शकते या उक्तीप्रमाणे यातीलच  एखादा आमदार गळाला लावून सत्ता काबीज करतात. याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

खरे तर मूलभूत गरजा ज्या निवडणुकीच्या वचननाम्यात प्रत्येक पक्ष देत असतो त्याची आठवण जरी सत्ताधार्यांना करून दिली तरी खूप झाले असे म्हणता येईल.  भ्रष्टाचार मुक्त शहर, रोजगार, अन्न , वस्त्र , निवारा, स्वच्छ व मुबलक पाणी , आरोग्य , स्वच्छ शहर या मूलभूत गरजा आहेत. त्यातील एक म्हणजे पाणी हा येथील महिलांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. ‘ धरण उशाला आणि कोरड घशाला ‘अशी अवस्था पिंपरी चिंचवडकारांची झाली आहे  १०० % धरण भरले असताना दिवसाआड पाणी ? हा मुद्दा जरी आक्रमकतेने लावून धरला आणि हक्काचे  दररोज जर पाणी पुरवठा करदात्यांना मिळवून दिला तरी खूप मतदानावर परिनाम  होऊ शकतो हे लहान बालकलाही समजते पण विरोधकांना उमजत नाही ही येथील राजकारणाची शोकांतिका आहे.

असे अनेक मुद्दे आहेत. दहशद, स्मार्टसिटी मधील भ्रष्टाचार पण ……इच्छाशक्ती असेल तरच मार्ग दिसेल.

खरेच सत्ता काबीज करायची की आपले हित साध्या करायचे हाच मोठा प्रश्न येथील नागरिकांना पडलेला आहे.

येथे तर केव्हा केव्हा सर्वसाधारण सभेत व इतर कित्येकदा  कोरोनाकाळात केलेला भरष्टाचार येथील सत्ताधारी नेगरसेवकांनीच आक्रमकतेने पुढे आणत घरचा आहेर दिला पण त्याचेही भांडवल हित जोपासत बसणाऱ्या विरोधकांना करता आला नाही. इतर पक्षांविषयी काय बोलणार तीन चा प्रभाग झाल्याने व पक्षातील बंडाळी यामुळे त्यांचेही अवसान गळून पडल्याचे चित्र सध्यातरी दिसते. म्हणजेच कितीही आणि काहीही केले तरी सत्ताधारी जोमात आणि विरोधातील फक्त कार्यकर्तेच कोमात.? असेच चित्र सध्या तरी पिंपरी चिंचवडचे आहे असे जाणकार बोलतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *