महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी पिंपरी चिंचवड च्या नेत्यांचे पवार साहेबांकडे साकडे

रोहित खर्गे
विभागीय संपादक
३० सप्टेंबर २०२१

पिंपरी

पिंपरी-चिंचवडमधील नेत्यांनी घेतली शरद पवार साहेबांची भेट

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचार आणि आगामी महापालिका निवडणुकीची व्ह्युवरचना ठरविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारचे प्रणेते शरद पवार यांची आज भेट घेतली. सत्ताधा-यांकडून विविध विकासकामांमध्ये होणा-या भ्रष्टाचारावर बराच वेळ चर्चा करण्यात आली. त्यानंतर आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाची भूमिका ठरविण्यासाठी 13 ऑक्टोबर रोजी शहरातील माजी नगरसेवकांची पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचा निर्णय झाला असून 16 ऑक्टोबर रोजी पक्षाचा मेळावा घेण्याचे निश्चित झाले आहे, अशी माहिती आमदार अण्णा बनसोडे आणि माजी आमदार विलास लांडे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि स्मार्ट सिटी योजनेद्वारे शहरात भ्रष्टाचाराचा सुकाळ झाला असून नागरिकांच्या पैशांवर दिवसाढवळ्या दरोडा टाकला जात आहे. प्रत्येक विकासकामांच्या निविदेत जवळच्या व्यक्तीला किंवा नातेवाईकाला सहभागी करून सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी चुकीची कामे करत आहेत. कोविड काळातील मास्क, औषधे, ऑक्सिजन, पीपीई किट व तत्सम खरेदी, नदी सुधार प्रकल्प, अमृत योजना, कच-याचे बायोमायनिंग, यांत्रिक पध्दतीने रस्ते सफाईची निविदा, स्मार्ट सिटीतील खोदाई असेल अथवा शैक्षणिक खरेदी आदी कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरू आहे. हा भ्रष्टाचार रोखून यात सहभागी असणा-या अधिकारी व सत्ताधारी पक्षाच्या पदाधिका-यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे निवेदने देऊन वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. अजितदादांनी प्रशाकीय स्तरावर अधिका-यांच्या बैठका घेऊन संबंधित कामात पारदर्शकता आणण्याची भूमिका पार पाडली आहे.

अजितदादांचे शहरातील नागरिक केंद्रीत प्रत्येक गोष्टीवर लक्ष असतेच शिवाय पवार साहेबांनी सुध्दा पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शहरात यावे, ही मागणी करण्याकरिता आमदार अण्णा बनसोडे आणि माजी आमदार विलास लांडे यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते तसेच माजी नगरसेवकांच्या शिष्ठमंडळाने आज पवार साहेबांची भेट घेतली. सत्ताधा-यांनी केलेल्या भ्रष्टाचारासह विकासकामांच्या सर्वच मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली, असे माजी आमदार लांडे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी महापौर आझमभाई पानसरे, स्थायी समितीचे माजी सभापती अतुल शितोळे, जगदीश शेट्टी, माजी उपमहापौर मोहम्मदभाई पानसरे, माजी नगरसेवक शामराव वाल्हेकर, रामआधार दारिया, शिक्षण मंडळाचे माजी सभापती श्रीरंग शिंदे आदी उपस्थित होते.

आमच्या मागणीचा विचार करून 13 ऑक्टोबर रोजी पिंपरी-चिंचवड शहरात येऊन माजी नगरसेवकांची बैठक घेण्यास पवारसाहेबांनी अनुमती दर्शविली आहे. तसेच, आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिशा देण्यासाठी पक्षाचा मेळावा घेण्यासही त्यांनी संम्मती दाखविली आहे. हा मेळावा 16 ऑक्टोबर रोजी होणार असून पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना पवारसाहेब मार्गदर्शन करणार आहेत, असे माजी आमदार लांडे यांनी सांगितले.

पालिकेवर एकहाती सत्ता आणण्यासाठी जीवाचे राण करणार

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारसाहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवा नेते पार्थदादा पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे, प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक होणार आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणण्यासाठी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, अध्यक्षा वैशालीताई काळभोर, आमदार अण्णा बनसोडे, माजी महापौर आझमभाई पानसरे आम्ही सर्वजण शहरातील प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन एकदिलाने काम करणार आहोत. महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सर्वजण जीवाचे राण करू, असेही माजी आमदार लांडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *