दिघीतील दत्तगड पायथ्याशी असलेल्या पाण्याच्या टाकीचे व्यवस्थापन सक्षम करा

रोहित खर्गे

विभागीय संपादक

दि १६ सप्टेंबर २०२१

दिघी

 नगरसेवक विकास डोळस यांची मागणी

दिघीतील दत्तगड पायथ्याशी असलेल्या पाण्याच्या टाकीचे  व्यवस्थापन सक्षम करा. शहरातील नागरिकांना दिवसाआड पाणी मिळत आहे, अशा परिस्थितीत टाकी ओव्हर फ्लो झाल्याने लाखो लीटर पाणी वाया गेले. त्यामुळे प्रशासनाने योग्य नियोजन करून टाकीचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना समज द्यावी, अशी मागणी भाजपा नगरसेवक विकास डोळस यांनी केली आहे.

याबाबत महापालिका पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता प्रवीण लडकत यांना निवेदन दिले आहे.

सह शहर अभियंता प्रवीण लडकत यांना निवेदन

निवेदनात म्हटले आहे की, दिघीसह संपूर्ण पिंपरी-चिंचवडमध्ये पाण्याच्या तुटवड्यामुळे एकीकडे पालिका प्रशासन नागरिकांना दिवसाआड पाणी पुरवठा करीत आहे. असे असताना दिघी भागाला पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झाल्याने लाखो लीटर पाणी वाया गेल्याचा गंभीर प्रकार  घडला आहे. वारंवार असे प्रकार घडत आहेत, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

शहरात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे दिघीतील दत्तगड पायथ्याशी असलेली पाणीटाकी वारंवार ओव्हर फ्लो होवून पाणी वाया जात आहे. याकडे पाणीपुरवठा विभागाचेही अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. महापालिका अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, अशी स्थानिक नागरिकांची तक्रार आहे.

त्यामुळे महापालिका पाणीपुरवठा विभागाने दत्तगड पायथ्याशी असलेली पाणी टाकीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना तात्काळ कारणेदाखवा नोटीस द्यावी. तसेच, भविष्यात टाकी ओव्हर फ्लो होवून पाणी वाया जाणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी आमची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *