खेड तालुक्यातील काळूस गावच्या शिक्षिका सौ. सीमा शेलार “राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न २०२१” पुरस्काराने सन्मानित…

राजगुरूनगर दि 9 सप्टेंबर2021

प्रतिनिधी – अक्षता कान्हूरकर

खेड तालुक्यातील काळुस येथे राहणाऱ्या सौ. सीमा संतोष शेलार यांना महाराष्ट्र राज्य मनुष्यबळ लोकसेवा विकास अकादमी यांच्यातर्फे शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील थिटे परिवारातील त्या कन्या. लहानपणापासूनच कामातील प्रामाणिकपणा, प्रचंड मेहनत,विविध कला व जिद्द या त्यांच्या अंगभूत गुणांमुळे आज शिक्षण क्षेत्रात त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. चाकण मधील उपक्रमशील शाळा म्हणून नावारूपास असलेले नवोन्मेष विद्यामंदिर चाकण याठिकाणी त्या कार्यरत आहेत.


अध्यापनाबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी नाट्यलेखन, नाट्यदिग्दर्शन, नृत्यदिग्दर्शन, वकृत्व, गायन, मार्गदर्शनपर व्याख्याने या स्वरूपात नेहमी कार्यरत असतात. त्यांच्या या कार्याची दखल मनुष्यबळ लोकसेवा विकास अकादमीने घेत त्यांना पुरस्कार प्रदान केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनुष्यबळ लोकसेवा विकास अकादमीतर्फे दिनांक पाच सप्टेंबर रोजी ऑनलाइन पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करून सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, सन्मानचिन्ह, महावस्त्र, मानकरी बॅच, सन्मानपदक आणि मानाचा फेटा असे आहे. नवोन्मेष विद्यालयाचे संस्थापक, मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वृंद,त्यांचे कुटुंबीय, आप्तेष्ट,मित्र परिवार , समस्त काळूस ग्रामस्थ आणि परिसरातील सर्वांनी त्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *