‘स्वराज्य ध्वज पूजन’ यात्रेची शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ल्यावर पूजा संपन्न…

जुन्नर प्रतिनीधी
०९ सप्टेंबर:

देशातील सर्वात उंच ध्वजाची प्रतिष्ठापना करून नवा विक्रम प्रस्थापित केला जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवानेते आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून ऐतिहासिक महत्व असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील शिवपट्टन म्हणजेच खर्डा किल्ल्यावर देशातील सर्वात उंच ध्वज उभारला जात आहे. ९ सप्टेंबर रोजी शिवजन्मस्थळ शिवनेरी किल्ल्यावर स्वराज्य ध्वजाची पूजा संपन्न झाली.

‘स्वराज्य ध्वज पूजन यात्रा’ गुरुवार, ९ सप्टेंबर रोजी कर्जत तालुक्यातील संत गोदड महाराज मंदिर येथे स्वराज्य ध्वजाची विधिवत पूजा संपन्न होऊन कोविडच्या सर्व नियमांचे पालन करत छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरी येथे मार्गस्थ झाली. शिवजन्मस्थळ शिवनेरी किल्ल्यावर स्वराज्य ध्वजाची पूजा संपन्न होऊन निर्धारित ठिकाणी पोहोचण्यासाठी यात्रा मार्गक्रमण करणार आहे. लोकसहभागातून महाराष्ट्रासह देशभरातील विविध ७४ प्रमुख अध्यात्मिक, धार्मिक स्थळी, संतपीठं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले या शक्तीपीठांच्या ठिकाणी तसेच श्रीराम मंदिर (अयोध्या), मथुरा, बोधगया (बिहार), केदारनाथ (उत्तराखंड) आदी ठिकाणी नेण्यासाठी ‘स्वराज्य ध्वज पूजन’ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

‘स्वराज्य ध्वज’ उभारणी करून ऐतिहासिक वारसा जपणे, पुढील पिढीला स्वराज्याच्या अकल्पित शौर्याची, मराठ्यांच्या संयुक्त फौजांचा शेवटचा विजय जेथे झाला त्या खर्डा किल्ल्याच्या इतिहासाची महती सर्वदूर पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. स्वराज्याच्या उभारणीसाठी आपल्या शौर्याचे, पराक्रमाचे नवे आयाम स्थापित करून विश्व स्तरावर महाराष्ट्राची महती अजरामर करणाऱ्या मावळ्यांच्या कीर्तीची साक्ष असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील शिवपट्टन म्हणजेच खर्डा किल्ल्याच्या आवारात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर (१५ ऑक्टोबर) या स्वराज्य ध्वजा ची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

दरम्यान, गुरूवारी दुपारी स्वराज्य ध्वज यात्रेच्या स्वागतासाठी शिवनेरी किल्ल्यावर जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, अंकुशराव आमले, पंचायत समिती सभापती विशाल तांबे, युवक राष्ट्रवादी अध्यक्ष सुरज वाजगे, अरूण पारखे, बाळा सदाकाळ, कुमशेदचे ग्रामस्थ तसेच जुन्नर तालुक्यातील शिवभक्त उपस्थित होते.

शिवनेरी गडावरून या स्वराज ध्वज यात्रेने गुरूवार दुपारी लेण्याद्री देवस्थानाकडे प्रस्थान केले. तिथे देवस्थानाचे अधिकारी आणि इतर स्थानिक व शिवभक्तांच्या उपस्थितीत या ध्वजाचे पूजन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *