शिरूर व श्रीगोंद्याच्या वाळू माफियांचे धाबे दणाणले : महसूल व पोलीस पथकाने सुमारे एक कोटींच्या बोटी व तत्सम ऐवज जागेवरच केला नष्ट

 

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
शिरूर : दि. ०५/०९/२०२१

शिरूर तालुक्यातील घोडनदी पात्र व चिंचणी धरण क्षेत्रात, शिंदोडी गावच्या हद्दीत अवैधरीत्या वाळू उपसा चालू असल्याच्या तक्रारी, शिरूरच्या तहसीलदार श्रीमती लैला शेख व शिरूरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे हे वाळूमाफिया नेहमीप्रमाणे घोडनदीतून पलीकडच्या हद्दीत म्हणजेच अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्याच्या हद्दीत पळून जाऊ नयेत, यासाठी शिरूरच्या महसूल विभागाने श्रीगोंदयाच्या महसूल विभागाशी आधीच संपर्क साधलेला होता. तसेच शिरूर पोलिसांनी श्रीगोंदा पोलिसांशी संपर्क साधल्याने, पुणे व नगर जिल्ह्यातील दोन्ही यंत्रणा सावध व सतर्क होत्या.
शिरूर च्या महसूल व पोलीस प्रशासनाने थेट नदीत उतरून कारवाई करण्याचे ठरविले, त्यावेळी त्यांना तेथे वाळू उपसा करणाऱ्या अनेक यांत्रिक बोटी दिसून आल्या. यातील बऱ्याचसा ऐवज हाती लागलेला असून, त्यावर काम करणारे लोक मात्र पळून जाण्यास यशस्वी ठरले आहेत.
महसूल व पोलीस प्रशासनाने अचानक केलेल्या या कारवाईमुळे मात्र वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

यावेळी होत असलेल्या वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी, स्वतः तहसीलदार लैला शेख त्यांचे महसूल पथक व शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत व पोलीस कर्मचारी हे तीन सप्टेंबर रोजी पहाटे 5
पाच वाजटा कारवाईला गेले. आणि शिरूर व श्रीगोंदा महसूल व पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मोठा ऐवज नष्ट करण्यात या यंत्रणेला यश आलेय.


शिंदोडी गावच्या हद्दीत महसूल व पोलीस पथक कारवाईला पोहचले असता, घोड नदी पात्रात दहा यांत्रिक बोटीद्वारे वाळू उपासा सुरु असलेला त्यांना दिसला. पथकाची चाहूल लागताच, बोटीवाले वडगाव शिंदोडी, ता. श्रीगोंदा, जी. अहमदनगर या हद्दीत पळून जाऊ लागले. परंतु यावेळी शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांनी श्रीगोंद्याचे तहसीलदार यांना आधीच फोनद्वारे कळवलेले असल्याने, तसेच शिरूरच्या पोलीस निरीक्षकांनी बेलवंडी पोलिसांना, आधीच फोन करून कळविल्याने, श्रीगोंदा तहसील व पोलीस प्रशासन नदी पत्राच्या दुसऱ्या बाजूने असल्याने, बोटी चालकांना कुठलीच संधी नसल्याने, त्यांनी नदीपात्रात तशाच बोटी सोडून पळ काढला.

यावेळी महसूल व पोलीस प्रशासनाने सुमारे एक कोटी दहा लाख रुपयाच्या दहा बोटी ताब्यात घेऊन, त्या तेथेच नदीकिनारी नष्ट करण्यात आल्या.

या कारवाईमध्ये शिरूरच्या तहसीलदार लैला शेख, नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी, मंडलाधिकारी मनिषा खैरे, मंडलाधिकारी प्रशांत शेटे, तलाठी माधव बिराजदार, पी. बी. कोलगे, अमोल कडेकर, गणेश भिगोत, ज्ञानेश्वर चौधरी, अशोक बडेकर, सुशीला गायकवाड व श्रीगोंदा तहसीलचे मंडलाधिकारी जनार्दन सदाफुले, घनश्याम गवळी, संजय पोटे, आदेश जावळे, परमेश्वर ठोकळ आदींचा समावेश होता.

तर शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या नेतृत्वाखालील पथकात, सहा. पोलीस निरीक्षक संदीप कांबळे, पोलीस उपनिरीक्षक पडळकर, पो. हवा. देशमाने, संतोष साठे, पो.ना. सांगळे, जगताप, पो. कॉ. प्रविण पिठले, जंगम, साळवे
तर, बेलवंडी पोलीस स्टेशनचे सहा. फौजदार शिंदे, सुरवसे, पो. हवा. बारवकर आदींचा या कारवाईत सहभाग होता.

या कारवाईसाठी तलाठी विजय बेंडभर यांनी दिलेल्या तक्रारीवरून, शिरूर पोलीस स्टेशनला अवैध वाळू उपसा करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अनेक दिवसांतून झालेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे, महसूल व पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे.
अशाच धडाकेबाज कारवायांच्या अपेक्षा, येथून पुढेही असल्याचे लोक बोलून दाखवत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *