पकडले ते चोर……बाकी १६ साव ?

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी – दि २७ ऑगस्ट २०२१
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष ऍड नितीन लांडगे यांना जाहिरातींचा व्यवसाय करणाऱ्या एका ठेकेदाराने पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीनंतर या विभागाकडून स्थायी समिती अध्यक्ष ऍड नितीन लांडगे, त्यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे , संगणक चालक राजेंद्र शिंदे, लिपिक विजय चावरिया आणि शिपाई अरविंद कांबळे या पाच जणांना अटक केली होती. हे पाच जण सापडले म्हणून हे चोर ? पण यात खरे किती जण अडकले आहेत याची खरी माहिती समोर यायला हवी. बुधवारी स्थायी चा बाजार असतो हे सर्वश्रुत आहे. या बाजारात विकलेल्या मालाचे खरे भागीदार कोण कोण असतात हेही सर्वश्रुत आहे. मग जो पकडला जातो तोच चोर म्हणजे ते ५ जण चोर ? बाकीचे १६ साव ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. त्यामुळे या पाच जनांच्या बरोबरच बाकीचे पण या बुधवारच्या कुरण बाजारात चारणाऱ्यांवर कारवाई होणार ? असा प्रश्न पडतो. नुकतीच ऑडिओ रेकॉर्डिंग मध्ये पैशांची वाटप १६ जणांमध्ये होत असल्याबाबत उल्लेख झाला होता. व याबाबतच चौकशी करावयाची असल्याचा दावा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी २६ ऑगस्ट ला न्यायालयात केल्याने , आता सापडले ते ५ चोर पण बाकीच्या सदस्यांचे आता धाबे दणाणले आहे.
यातील ऍड नितीन लांडगे यांना २६ ऑगस्ट पर्यंत अंतरिम जामीन देण्यात आला होता. त्यावर झालेल्या सुनावणीत एसीबी ने नायलायसमोर आपले लेखी म्हणणे मांडले त्या अर्जामध्ये स्थायी समितीच्या १६ सदस्यांच्या तपासाबाबत उल्लेख केला आहे. व आता त्या १६ जनांवरही कारवाई होणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. त्यामुळे या पकडलेल्या व चोर समजल्या जाणाऱ्यांच्या यादीत आता वाढ होणार असल्याचे समजते.
म्हणजे पकडले गेले ते चोर आणि पापात हिस्सा असणारे “साव ” आता एसीबी च्या रडारावर आहेत. लवकरच यांनाही चोर घोषित करण्यात येणार ? की अभय मिळणार हे येणारा काळच सांगेल.
पण या कुरणात चरून झालेल्यांचेही धाबे दणाणले असून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी २०१७ पासून स्थायीत असणाऱ्या सर्वांचीच चौकशी करून जे भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात सापडतील त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीला आता जोर धरू लागला आहे.
यात मागील स्थायी समिती अध्यक्ष व सदस्यांचीही कारकीर्द पुन्हा तपासून पहावी असे सांगण्यात आले.
म्हणजे आता मागील सर्वच या बुधवारच्या कुरणात चरले त्यांच्यावरही कारवाई होणार ? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
खरे तर पूर्वी या बुधावरच्या कुरणात चारणारे मिळेल तेव्हडा चारा खाऊन तृप्त असे. पण हल्ली या कुरणात चरणारे तृप्त होत नाहीत ” चारा खाऊन भारा पण बांधून घेणारे ” समोर आले आहेत. व ही प्रथा अलीकडे काही माजी स्थायी समिती अध्यक्षांनी आणली. कुरणात चरताना टक्केवारीवर समाधान न मानता डायरेक्ट भाऱ्यातच हात घालण्याची संस्कृती (येणाऱ्या एखाद्या प्रजेक्ट मध्ये भागीदारच व्हायचे ) समोर आली आणि त्याचाच हा उद्रेक असल्याचे बोलले जाते. आणि ही संस्कृती आणणारे खूप हुशार होते, सावधतेणे पाऊले टाकत होते. असे गेंड्याची कातडी असणारे राजरोजपणे कुरण चरनारे केव्हाच अशा एसीबी सारख्या कारवाईत सापडले नव्हते. कारण सर्व बाजूने अभ्यास करूनच ते ” साव” या कुरणात बेधडक घुसत असे.
या बाजारात सापडले ते माऊली पुत्र नितीन लांडगे हे शांत स्वभावी व मिळेल तेव्हडा चारा यातच धन्यता मानणारे आहेत असा सूर जाणकारांकडून आळवला गेला. एसीबी ची कारवाई वगैरे असे काही होऊ शकते हे त्यांच्या ध्यानी मनी ही नव्हते पण तेच अलगद एसीबी च्या जाळ्यात अडकले. आता पुढे ऍड नितीन लांडगे आक्रमक होतात की स्वतःचा बचाव करण्याची धडपड करतात हे येणारा काळच सांगेल. त्यांच्यामागे उभे असलेले ” चाणक्य ” काय पवित्रा घेतात हेही पहाणे महत्वाचे असेल. पण स्वतःचे घर काचेचे असलेल्याने ते इतरांच्या घरावर दगड फेकण्याचे साहस करतील असे वाटत नाही.
आता शांत वाटणारे हे प्रकरण आणि विरोधक भांडवल करून रान पेटवण्याचा आव आणत आहेत.
पण त्याच स्थायीच्या कुरुणामध्ये मध्ये सर्वपक्षीय सदस्य आहेत हे विरोधकांनीही विसरू नये.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत २०१७ च्या निवडणुकीत भाजपची एक हाती सत्ता आली आणि पहिल्या स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे झाल्या, त्यानंतर खऱ्या अर्थाने महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू झाला ठेकेदारांकडून जास्त प्रमाणात टक्केवारी मागितली जाऊ लागली. काही ठेकेदारांकडून भागीदारी घेण्यात आली याची तक्रार त्यावेळेस प्रमोद साठे नामक व्यक्तीने थेट पंतप्रधान कार्यालयात केली. यांच्या वर्तमानपत्रात बातम्या आल्या मात्र केंद्रात राज्यात व महापालिकेत भाजपाची सत्ता असल्याने चौकशी झाली नाही. त्यामुळे महापालिकेत भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला.

आज २०१७ ला का भाजपच्या पापाचा घडा भरला व लाच घेताना स्थायी समितीचा लिपिक पकडला गेला. स्थायी समितीचे अध्यक्ष ऍड. नितीन लांडगे यांना अटक झाली त्यामुळे स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष सीमा सावळे, ममता गायकवाड, विलास मेडीगिरी, संतोष लोंढे व विद्यमान अध्यक्ष ऍड. नितीन लांडगे यांच्या संपत्तीची त्यांच्या कुटुंबाची व निकटवर्तीयांच्या बेहिशोबी संपत्तीची चौकशी करा व योग्य ती कारवाई करा. असे निवेदन नुकतेच सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बबन वाघेरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आयुक्त राजेश पाटील यांना दिले.
आता खऱ्या अर्थाने या पाच जणांच्या वेतिरिक्त कुरणात चारणाऱ्या या मानवरूपी जनावरांना एसीबी कोंडवाड्यात टाकणार ? व सर्वपक्षीय भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई होते ? याकडे सगळ्या शहराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *