पिकाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी पिकवणार गांजाची शेती…

नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)

देशपातळीवर व राज्यात देखील सध्या कुठल्याच शेती मालाला रास्त भाव नाही, टोमॅटो, भाजीपाला रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. ढोबळी मिरचीची देखील तीच अवस्था झाली आहे. अवाढव्य खर्च करून देखील शेतकरी कधी बोलत नाही. तो नव्या जोमाने दुसऱ्या पिकांची लागवड करतो. मात्र कांदा, वांगी, टोमॅटो यांचा दर थोडा जरी वाढला तरी सर्वसामान्य नोकरदार व्यापारी म्हणतात आमचे बजेट कोलमडले. यामुळे सर्वांपेक्षा सध्या गांजाला चांगला बाजारभाव आहे. तो लावण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी. १५ सप्टेंबरपर्यंत परवानगी न दिल्यास १६ सप्टेंबरला परवानगी दिली असे गृहीत धरून मी दोन एकरावर गांजा लावणार असे शिरापूर (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील शेतकरी अनिल आबाजी पाटील यांनी तशा स्वरूपाची थेट मागणी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या शेती मालाला भाव नाही. उत्पादन खर्च मोठा आहे. कर्जाचा बोजा वाढत चाललाय. शासन कुठल्याही मालाला समाधानकारक हमीभाव देत नाही. त्यामुळे नवीन पिके घेऊन कर्जात जाण्यापेक्षा पैसे मिळणारे पीक लावले तर फायदा होईल म्हणून मी गांजा लागवडीची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.
याविषयी शेतकरी अनिल पाटील यांनी पत्राद्वारे सांगितले की, २३ ऑगस्टला आत्महत्या करायची, असा निश्‍चय करून, बरोबर दोरी घेऊन मी शेतात गेलो होतो. ज्या झाडाला गळफास घ्यायचा ठरवलं होतं त्या झाडाखाली थोडा वेळ बसलो. व शांत डोक्‍याने विचार केला. मी मेलो तर माझ्या बायको- मुलांचे काय होईल, त्यांना कोण वाली असणार, पूर्ण संसार उघड्यावर पडेल म्हणून मी तो विचार रद्द केला व गांजा लागवडीची परवानगी मागितली आहे.
याबाबतचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *