४१ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मिळालेलं हॉकीतलं ऑलिंपिक पदक भारतीय हॉकीच्या ‘सुवर्ण’युगाच्या दिशेने नवी सुरुवात ठरेल – अजित पवार

भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिंपिक कांस्यपदक जिंकल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून संघाचे अभिनंदन

मुंबई- दि. ५ ऑगस्ट २०२१
चक दे इंडिया – ४१ वर्षांची प्रतिक्षा… प्रयत्न… परीश्रमानंतर मिळालेल्या या यशाचा आनंद अवर्णनीय आहे. या पदकाने देशाचा गौरव वाढला असून भारतीय हॉकीच्या ‘सुवर्ण’युगाच्या दिशेने ही नवी सुरुवात ठरेल.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी ऑलिंपिक कांस्यपदक विजेत्या भारतीय पुरुष संघाचे अभिनंदन केले आहे.

भारतीय पुरुष हॉकी संघाने संघर्षपूर्ण खेळ करत ऑलिंपिक कांस्यपदक जिंकल्याबद्दल संघातील खेळाडू, प्रशिक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

भारतीय पुरुष हॉकी संघाने कधीकाळी ऑलिंपिकची आठ सुवर्णपदकं जिंकली होती. १९८० च्या शेवटच्या पदकानंतर पदक जिंकण्यासाठी आजपर्यंत प्रतिक्षा करावी लागली. गेल्यावेळच्या कांस्यपदक विजेत्या जर्मनीविरुद्ध १-३ अशा गोल पिछाडीवर असतानाही संघाने ५-४ गोलफरकाने मिळवलेला विजय हा दूर्दम्य इच्छाशक्ती, संघभावना, कठोर परीश्रमांचे फळ आहे. भारतीय खेळाडूंनी आज देशवासियांची मने जिंकली आहेत. मी सर्व खेळाडूंचं, प्रशिक्षकांचं, व्यवस्थापक, सपोर्ट स्टाफचं अभिनंदन करतो. भविष्यातील सुवर्ण कामगिरीसाठी शुभेच्छा देतो. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा संदेशात भारतीय हॉकी संघाचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *