अवघ्या दीड दिवसाची शाळा शिकून, साहित्यरत्न किताब मिळविलेल्या अण्णा भाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंती निमित्त, त्यांच्या साहित्य निर्मितीची छोटीशी ओळख…

बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे
शिरूर : दि. १ ऑगस्ट २०२१

      लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची आज जयंती. त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडीलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते. ज्ञानाचे धनी असलेले साठे हे शाळेत शिकले नाहीत. ते फक्त दीड दिवस शाळेत गेले. तेथील सवर्णांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून देण्याचा निर्णय घेतला. अण्णा भाऊ साठे हे एक समाजसुधारक, शाहीर, लोककवी आणि लेखक होते. दलितांमधील खदखद त्यांनी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला साठे यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता, पण नंतर ते मार्क्सवादी – आंबेडकरवादाकडे वळले. भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण तरीही उच्चवर्णीयांचे राहिलेले वर्चस्व त्यांना मान्य नव्हते. त्यांनी १६ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबई येथे वीस हजार लोकांचा मोर्चा काढला.
“ये आझादी झूठी है, देश कि जनता भूखी है!”
अशी मोर्च्यातील घोषणा होती.
दलित आणि कामगारांच्या जीवनातील सत्य परिस्थिती व्यक्त करण्यासाठी अण्णा भाऊ साठे यांनी कथांचा वापर केला.
     “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून, ती दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे” 
      असं ते १९५८ मध्ये, बॉम्बेमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात उद्घाटन भाषणात म्हणाले होते. साठे यांनी विपूल लेखन केले. त्यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये फकिरा (१९५९) समाविष्ट आहे. फकिराला १९६१ मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला.
त्यांचे १५ लघु कथा संग्रह आहेत. कादंबरी आणि लघुकथा यांच्याव्यतिरिक्त साठे यांनी अनेक नाटके, रशियातील भ्रमंती, १२ पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील १० गाणी लिहिली. अलीकडील विद्यार्थी व अभ्यासक, त्यांच्या या समग्र साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात.
  अण्णा भाऊ साठे : प्रातिनिधिक कथा (संपादक – डाॅ. एस. एम. भोसले), अमृत आघात आबी (कथासंग्रह), आवडी (कादंबरी), इनामदार (नाटक, १९५८), कापऱ्या चोर (लोकनाट्य), कृष्णाकाठच्या कथा (कथासंग्रह), खुळंवाडा (कथासंग्रह), गजाआड (कथासंग्रह), गुऱ्हाळगुलाम (कादंबरी), चंदन (कादंबरी), चिखलातील कमळ (कादंबरी), चित्रा (कादंबरी, १९४५), चिरागनगरची भुतं (कथासंग्रह), १९७८ (नवती, कथासंग्रह), निखारा (कथासंग्रह), जिवंत काडतूस (कथासंग्रह), तारा देशभक्त घोटाळे (लोकनाट्य, १९४६), पाझर (कादंबरी), पिसाळलेला माणूस (कथासंग्रह), पुढारी मिळाला (लोकनाट्य, १९५२), पेंग्याचं लगीन (नाटक), फकिरा (कादंबरी, १९५९), फरारी (कथासंग्रह), मथुरा (कादंबरी), माकडीचा माळ (कादंबरी, १९६३), रत्ना (कादंबरी), रानगंगा (कादंबरी), रूपा (कादंबरी), बरबाद्या कंजारी (कथासंग्रह, १९६०), बेकायदेशीर (लोकनाट्य, १९४७), माझी मुंबई (लोकनाट्य), मूक मिरवणूक (लोकनाट्य), रानबोका लोकमंत्र्यांचा दौरा (लोकनाट्य, १९५२), वारणेचा वाघ (कादंबरी, १९६८), वैजयंता (कादंबरी), वैर (कादंबरी), शेटजींचे इलेक्शन (लोकनाट्य, १९४६)
असे व इतर फार मोठे साहित्य अण्णा भाऊ साठे यांनी लिहून, त्यातून समाजाची सत्य परीस्थिती जगासमोर मांडून, समाजप्रबोधनाचे काम केले.
याशिवाय प्रवासवर्णन, माझा रशियाचा प्रवास आणि अनेक कविता त्यांच्या प्रसिद्ध असून, हे सर्व लिखाण उद्बोधक आहे. जगातील अनेक विद्यापीठांनी अण्णा भाऊंच्या साहित्याचा, विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केला असून, अनेकांनी त्यांच्या व त्यांच्या साहित्याच्या अभ्यासावर M. Phil. व Ph. D. मिळविलेली आहे.
      अशा या केवळ दीड दिवस शाळेत गेलेल्या व मातंग समाजाची अस्मिता असलेल्या महामानवाला, शतकोत्तर पहिल्या जयंतीच्या (१०१ व्या), आपला आवाज न्यूज नेटवर्क कडून आदराचे अभिवादन.

शब्दांकन : प्रा. रविंद्र पं. खुडे, (M.Sc/M.A.(Geo.), M.A.(Marathi), M.A.(History), B.Ed.
विभागीय संपादक : आपला आवाज न्यूज नेटवर्क तथा केबल टी. व्ही. चॅनेल,
तसेच पुणे जिल्हा कार्याध्यक्ष, पत्रकार संरक्षण समिती, महाराष्ट्र
(९४२२६५०७३५)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *