तब्बल ५४ वर्ष आमदार असलेले सांगोला येथील माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे दुःखद निधन…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

सांगोला- सोलापूर-दि ३० जुलै २०२१
सांगोला मतदार संघाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे आज शुक्रवार दि ३० जुलै रोजी सोलापूर येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते सांगोल्याचे तब्बल ५४ वर्ष आमदार राहिलेले गणपतराव देशमुख यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या दुष्काळी मतदार संघातून सलग ११ वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. याची गिनीज बुकातही नोंद आहे. साधी राहणी उच्च विचार हे त्यांचे ब्रीद होते. ते आपला प्रवास नेहमी एस टी ने करत असे. साधे राहणे, चारित्र्यसंपन्न , निष्कलंक अशी त्यांची ओळख होती.


त्यांचा साधेपणा एव्हडा होता तो मी माझ्या डोळ्याने पहिला आहे. आम्ही संगोल्यामध्ये एक साहित्यिक कार्यक्रम घेतला होता त्याचे निमंत्रण द्यायला गेलो तेव्हा बाहेर त्यांच्या पत्नी बसल्या होत्या आणि एका मुलाला त्या बोलावून सांगत होत्या हे कुलूप घेऊन जा आणि रिपेअर करून घेऊन ये. त्यांच्या अंगावर स्वच्छ पण ठिगळ लावलेली साडी होती ते दृश्य पाहून आम्ही अवाक झालो होतो. त्यावरूनच किती साधेपणा होता हे लक्षात येते.
त्यांचा दुसरा सर्वात भारी गुण म्हणजे वयाच्या ९० व्या वर्षी ही त्यांची स्मरणशक्ती अतिशय दांडगी होती. आम्ही बोलावलेल्या कार्यक्रमाला ते अगदी वेळेवर हजर राहिले होते आणि एकदा फक्त व्यासपीठावर बसलेल्या पाहुण्यांकडे नजर फिरवली आणि हातात कोणताही कागद न घेता त्यांनी व्यासपीठावरील सर्वांच्या सर्व मान्यवरांची नावे न चुकता घेतली व खर्ड्या आवाजात भाषणाला सुरवात केली.
सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात त्यांचा मोलाचा वाटा आहे. देशातील पहिली महिलांसाठीची सूतगिरणी देखील त्यांनीच सुरू केली.
आशा या साध्या, सरळ नेत्याला आपला आवाजकडून भावपुर्ण श्रद्धांजली !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *