शिरूर येथील एटीएम चोरीचा गुन्हा उघडकीस आणून ३ आरोपींकडून नगर, औरंगाबाद येथील चोरीच्या ४ मोटरसायकली जप्त : एकूण ५ गुन्हे उघडकीस आणून २ लाख ५५ हजाराचा माल जप्त : पुणे ग्रामीण एलसीबीची नगर जिल्हयात धडाकेबाज कारवाई

बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे
दि. 28/07/2021
      पुणे-नगर रोड, सरदवाडी, ता. शिरूर, जि. पुणे, येथील एटीएम चोरीच्या गुन्हयामध्ये, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेलापूर, जि. अहमदनगर येथून तिघांना जेरबंद करून, त्यांचेकडून औरंगाबाद व अहमदनगर येथून चोरलेल्या ४ मोटारसायकली, जप्त केल्याची माहिती, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
      दि. २० जुलै २०२१ रोजी रात्री १२:३० वा. चे सुमारास, पुणे-नगर रोड, सरदवाडी, ता. शिरूर जि. पुणे येथे असलेले ॲक्सिस बँकचे एटीएम कोणीतरी अज्ञात चोरटयांनी गॅस कटरचे सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केला व एटीएमच्या रूममध्ये असणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे तसेच एटीएमच्या मशीनचे नुकसान केलेबाबत, धनंजय दशरथ गायकवाड, वय २८ वर्ष, रा. कोंढापुरी, ता. शिरूर, जि. पुणे, यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
     सदर घडलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने, पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत करणेबाबत आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक नेमण्यात आले होते. सदर पथकाने आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासणी करून, आरोपींची माहिती काढली असता ते अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा फाटा या भागातील असल्याची माहिती समजली. सदर पथकाने अहमदनगर जिल्हयात जाऊन वेशांतर करून, त्यांच्या हालचालीवर पाळत ठेवली. दिनांक २७ जुलै रोजी आरोपी १) आकाश उर्फ निलेश अनिल गायकवाड, वय २७ वर्षे, रा. नेवासा, ज्ञानेश्वर मंदिर रोड, ता. नेवासा, जि. अहमदनगर. 
२) तन्मय उर्फ सोनल संदिप साळवे, वय २१ वर्षे, रा.नेवासाफाटा, मुकींदपूर ता. नेवासा, जि. अहमदनगर.
३) आशिष माणिक डुकरे, वय २१ वर्षे, रा. नेवासाफाटा, मुकींदपूर, ता. नेवासा, जि. अहमदनगर.
या सर्वांनी वाळूंज एमआयडीसी येथून पहाटेच्या सुमारास, दोन मोटारसायकली चोरून त्या बेलापूर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर येथे विक्री करणेसाठी येणार असल्याची माहिती, पोलीस पथकास एका खबऱ्याकडून मिळाल्याने बेलापूर येथे सापळा रचून या तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचेकडे पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, त्यांनी ७ दिवसापूर्वी शिरूर येथील सरदवाडी येथील एटीएम मशीन, गॅस स्प्रे च्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगून, औरंगाबाद वाळूंज एमआयडीसी येथून १ बजाज पल्सर व १ होंडा शाईन, तसेच अहमदनगर एमआयडीसी येथून १ होंडा शाइन व तोफखाना येथून १ होंडा पॅशन प्रो, अशा एकूण ४ मोटरसायकली चोरी केल्याचेही सांगितले आहे. त्याबाबत औरंगाबाद व अहमदनगर येथील पोलीस स्टेशनला चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सदर चोरीच्या ४ मोटारसायकली, किंमत रू. २,५५,०००/-  (दोन लाख पंचावन्न हजार) असा ऐवज या तिघा आरोपींकडून जप्त करून, त्यांचेकडून औरंगाबाद व अहमदनगर येथील मोटारसायकल चोरीचे ४ व पुणे जिल्ह्यातील एटीएम चोरीचा १, असे एकूण ५ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.
     सदर तिघा आरोपींना पुढील कारवाईसाठी शिरूर पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेले आहे. सदर आरोपी हे अट्टल सराईत गुन्हेगार असून, अहमदनगर, औरंगाबाद व पुणे जिल्ह्यामध्ये त्यांनी अशा प्रकारचे आणखीन गुन्हे केले असण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने पोलिसांचा तपास चालू आहे. आरोपींची पोलीस कस्टडी रिमांड घेवून पुढील अधिक तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे हे करीत आहेत.
     सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहा. पोलीस निरीक्षक सचिन काळे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, जनार्दन शेळके, राजू मोमीन, अजित भुजबळ, गुरु गायकवाड, सुभाष राऊत, अभिजित एकशिंगे, काशिनाथ राजापुरे यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *