गायरान जमिनीवरील अतिक्रमणे व तिची बेकायदेशीर झालेली विक्री, या मूळ मुद्याला बगल देण्यासाठीच माझ्यावर भ्रष्टाचाराचे बालीशपणाचे आरोप – अनिल नवले, पुणे जिल्हा सचिव, भाजप.

बातमी : विभागीय संपादक, रविंद्र खुडे
शिरूर : दि. 25/07/2021

शिरूर तालुक्यातील कारेगाव ग्राम पंचायत मधील आजी माजी सरपंचांचा वाद काही मिटता मिटेना. सध्या या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटाचे वर्चस्व आहे. तर या पूर्वीच्या पंचवार्षिक मध्ये भारतीय जनता पार्टीच्या गटाची पाच वर्षे सत्ता होती. भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन पुणे जिल्हा उपाध्यक्ष अनिल नवले यांनी यावेळी पाच वर्षे सरपंचपद भूषविले होते. त्यामुळे कारेगाव मध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, असा सत्तासंघर्ष पहिल्यापासूनच आहे. भाजप च्या अनिल नवले यांच्या आधी ग्राम पंचयातवर राष्ट्रवादीची सत्ता होती. आणि त्या काळातील ग्राम पंचायत मधील दीड कोटी रुपयांचा भ्रष्टाचार उघड केल्याचा दावा, भाजपच्या अनिल नवले यांचा असून, त्यासंदर्भात तत्कालीन ग्रामसेवक यांना अटक झाली होती, तर सरपंच व बाकीच्या लोकांना अटकपूर्व जामीन मिळालेले होते. त्याबाबतचा न्यायालयीन खटला सुरू असतानाच, पुन्हा एकदा सत्ता संघर्षातून येथे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी येथील राजकारणी दररोज झाडत असल्याचे, आख्खा शिरूर तालुका पाहत आहे.

कारेगाव MIDC मुळे येथील अर्थव्यवस्थेला बळकटी असल्यानेच, येथील ग्रामपंचायतवर सत्ता अबाधित ठेवण्याचा अतोनात प्रयत्न नेहमीच येथे पाहायला मिळालाय.

काही दिवसांपूर्वी भाजपचे विद्यमान जिल्हा सचिव व कारेगावचे माजी सरपंच अनिल नवले यांनी, येथील सरकारी गायरान जमिनीवर काही राजकीय लोकांनी अतिक्रमणे करून, त्या जमिनी बेकायदेशीरपणे खाजगी लोकांना विकल्याचा दावा, माजी सरपंच अनिल नवले यांनी केला होता व तशी तक्रार त्यांनी शासनाकडे केलेली होती. संबंधित ठिकाणच्या गायरान जमिनीची शासकीय मोजणी करण्याची मागणीही त्यांनी केली होती. 15 जुलै 2021 पर्यंत जर मोजणी झाली नाही, तर शिरूर तहसील कार्यालय आवारात उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी शासनास दिला होता. परंतु कोव्हिड च्या पार्श्व भूमीवर उपोषणाची परवानगी शासनाने नाकारलेली होती.


त्यानंतर मात्र विद्यमान ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व त्यांच्या गटातील काही सदस्यांनी, माजी सरपंच अनिल नवले यांच्या सरपंच पदाच्या कालखंडातील, म्हणजेच मागिल पंचवार्षिक मधील कामात अनेक कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे व त्याबाबत संबंधित दप्तर तपासणीची मागणी, शासनाकडे केलेली होती. त्यानुसार शिरूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, यांनी चार सदस्यीय पथक नेमून कारेगाव ग्राम पंचयातच्या मागील पंचवार्षिक मधील कामकाजात काही अफरातफर व भ्रष्टाचार झालाय का ? हे पाहण्यासाठी सध्या दप्तर सुरू आहे.
परंतु अनिल नवले यांनी या दप्तर तापसणीवर आक्षेप घेत, शिरूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना 23 जुलै 2021 रोजी निवेदन दिले असून, त्यात म्हटले आहे की, “कारेगाव ग्रामपंचायत मध्ये जी दप्तर तपासणी चालू आहे, त्यात विद्यमान महिला सरपंच यांचे पती तसेच काही सदस्य, हे तपासणी अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असून, गटविकास अधिकारी यांनी संबंधितांना योग्य ती ताकीद द्यावी” असे निवेदन अनिल नवले व त्यांच्या गटाने गटविकास अधिकारी यांना दिलेय. त्यामुळे, कारेगाव ग्राम पंचायतमधील राजकारणात काही वर्षांपासून पडलेली ठिणगी, आजही पेटत राहिल्याचे चित्र दिसत असून, ती विझते की आणखी आग भडकते याकडेच संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.
तर काही लोकांच्या चर्चेनुसार, पुढे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व सहकारातील निवडणुकांची पायाभरणी यात दिसत असल्याचे बोलले जात आहे.

  अनिल नवले यांनी दप्तर तपासणीवर आक्षेप घेत, गटविकास अधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर पत्रकार परिषदेत माहिती दिली की, "विद्यमान सरपंच, उपसरपंच यांनी अभ्यास करूनच आरोप करावेत. कारण वास्तविक पाहता ग्रामपंचायतीचा मागील पंचवार्षिकचा टर्न ओव्हर हा मुळात 30 ते 32 कोटिंचाच आहे. तर मग विरोधक जे 50 कोटी बोलत आहेत, ते आले कोठून ? 

शिवाय, सौर प्रकल्प हा माझ्या काळात झाला नसून, तो माझ्या अगोदरच्या कार्य काळात झालेला आहे. माझ्या काळात तत्कालीन सरपंच उपसरपंच यांनी केलेला कोटींचा भ्रष्टाचार मी बाहेर काढलाय. तसेच, कारेगाव ग्रामपंचायतीमध्ये एप्रिल 2011 ते ऑगस्ट 2015 या कालावधीत, तत्कालीन सरपंच, उपसरपंच यांनी विविध विकास कामे करताना सुमारे 85 ते 90 लाख रुपयांची सोलर दिवे खरेदीची बिले काढल्याचे दिसून येत आहे. मात्र प्रत्यक्षात गावामध्ये कुठेही सोलर दिवे लावण्यात आलेले नाहीत. फक्त खरेदी बिले जोडलेली असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सदरील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी शासनाने करून, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच गायरान जमिनीची मोजणी करावी अशी मागणी मी पुढे केल्यामुळेच, या प्रकरणातून लक्ष विचलीत करण्यासाठीच माझ्यावर बालिशपणाचे आरोप करण्याचे काम विद्यमान ग्राम पंचायत बॉडी करत
असून, त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही.” अशी माहितीकारेगावचे माजी सरपंच अनिल नवले यांनी पत्रकार परिषद घेत दिलीय.
तसेच, विद्यमान सरपंच व ग्राम पंचायत बॉडीने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देत, मागच्या पंचवार्षिक मध्ये अनेक कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे सांगत तसे निवेदन दिल्याने, गटविकास अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवीत लगेचच चार सदस्यीय पथकाद्वारे दप्तर तपासणी सुरू केलीय. परंतु अशीच तत्परता आमच्या बाजूनेही दाखवीत, आम्ही केलेल्या मागण्यांचीही चौकशी ताबडतोब करण्याचे, अनिल नवले यांनी म्हटलेले आहे.
एकंदरीत कारेगाव ग्राम पंचायत मधील भ्रष्टाचाराच्या आरोप प्रत्यारोपांमुळे, हा वाद पुढे आणखी चिघळण्याचेच संकेत दिसत आहेत. परंतु या राजकारणात सर्वसामान्य जनतेला रस नसून, त्यांना गावचा विकास व्हावा एवढीच माफक अपेक्षा असल्याचे, जुन्या जाणत्या व ज्येष्ठ नागरिकांना आपला आवाज न्यूज नेटवर्कला माहिती देताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *