महागाईमुळे राज्यात गावागावात नागरीकांमध्ये तीव्र असंतोष – विनायक देशमुख

असंघटीत कामगार काँग्रेसचे
महागाईविरोधी पिंपरीत आंदोलन आणि सह्यांची मोहिम

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि १५ जुलै २०२१
लोकसभा निवडणूक काळात भाजपने दिलेल्या फसव्या आश्वासनांना नागरीक बळी पडले. त्या नागरीकांना आता अच्छेदिनची जाणीव व्हायला लागली आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या चूकीच्या निर्णयामुळे पेट्रोल, डिझेल, गॅस, सीएनजीची उच्चांकी भाववाढ झाली आहे. याकडे दुर्लक्ष करीत केंद्र सरकारने सामान्य नागरीकांना महागाईच्या खाईत लोटले आहे. यामुळे राज्यात गावागावात नागरीकांमध्ये तीव्र असंतोष आहे. याचा कधीही उद्रेक होऊ शकतो. सरकारने याची दखल घ्यावी आणि महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी इंधन दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायक देशमुख यांनी केली.


केंद्र सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे उच्चांकी इंधन दरवाढ झाली आहे. इंधन दरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश घरेलू महिला कामगार काँग्रेसच्या समन्वयक शितल कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. 15 जुलै) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात महिलांनी चूल पेटवून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत आंदोलन केले. यानंतर सह्यांचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले. या आंदोलनापुर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, विनायक देशमुख, पिंपरी चिंचवड असंघटीत काँग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे, माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे, असंघटीत कामगार काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुनिल शिंदे, पुणे शहराध्यक्ष सखाराम पळसे, पुणे जिल्हा ग्रामिण अध्यक्ष विजय जाधव, महाप्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस रेखा चव्हाण, शहर काँग्रेसचे नेते संदेश नवले, आबा खराडे यांच्या उपस्थितीत सह्यांचे अभियान सुरु करण्यात आले. आंदोलनात वंदना आराख, संजना कांबळे, नसिमा मोमिन, हिना बागवान, फातिमा शेख, मालन गायकवाड, मोहन उनवणे, अझर पुणेकर, नितीन पटेकर, दिलीप साळवे, सौरभ खरात, निलेश ओव्हाळ, अशोक गायकवाड, रमेश गोरखा, प्रदिप कांबळे, सुनिल फुले, मिनाक्षी फुले, दिलीप गायकवाड, ज्ञानोबा पांढरे, निलेश दुबळे, अनिल टोपे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.
केंद्र सरकारचा निषेध करताना सुंदर कांबळे म्हणाले की, भाजपच्या फसव्या आश्वासनांचे लोन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेपर्यंत आले आहे. मनपातील भाजपाच्या महापौरांनी कोरोना काळात सामान्य नागरिकांना मदत म्हणून तीन हजार रुपये देण्याचे जाहिर केले. नंतर तांत्रिक अडचणींचा मुद्दा सांगून गोरगरीबांच्या तोंडाला पाणी पूसली असून गरीबांची थट्टा उडवून अपेक्षा भंग केला आहे.
महाराष्ट्र प्रदेश घरेलू महिला कामगार काँग्रेसच्या समन्वयक शितल कोतवाल म्हणाल्या की, यूपीए सरकारच्या काळात तीनशे पन्नास रुपयांना मिळणारा घरगुती गॅस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात आता दुप्पटीहून जास्त महाग झाला आहे. पेट्रोल दर केंव्हाच शंभरीपार झाले आहे. महिलांना कुटूंबाचा गाडा हाकणे जिकरीचे झाले आहे. पिंपरी चिंचवड कामगार नगरीत दोन लाखांहून जास्त महिला घरेलू कामगार व इतर असंघटीत क्षेत्रात काम करीत आहेत. या सरकारने त्यांची साधी नोंदणीही केली नाही. या असंघटीत महिलांना केंद्र सरकारकडून महागाईच्या निर्देशांकानुसार मासिक तीन हजार रुपयांचे अनुदान कोरोना संपेपर्यंत द्यावे. हि मुख्य मागणी महिलांची आहे. आंदोलनानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *