तलवार हातात घेऊन दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगारास, गावठी पिस्टलसह अटक – हेमंत शेडगे, पो. नि. शिक्रापूर…

बातमी : विभागीय संपादक
            रविंद्र खुडे
शिक्रापूर : दि. 13/07/2021

      शिक्रापूर येथे हातामध्ये तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या युवकाला त्याच्या जवळील तलवारीसह एक पिस्तुल व जिवंत काडतूस आणि मोटारीसह जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले आहे. वैभव संभाजी आदक असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे.
     शिक्रापूर येथील तळेगाव ढमढेरे रस्त्याच्यालगत, एक युवक हातामध्ये तलवार घेऊन दहशत निर्माण करत असल्याची माहिती पोलिस शिपाई निखील रावडे यांना मिळाली. ही बाब त्यांनी आपल्या वरीष्ठांच्या कानावर घातली. त्यानंतर लगेचच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन अतकरे, विक्रम साळुंके, पोलिस हवालदार जितेंद्र पानसरे, पोलिस नाईक अमोल दांडगे, श्रीमंत होनमाने, शिवाजी चीतारे, विकास पाटील, सागर कोंढाळकर, पोलिस शिपाई जयराज देवकर, राहुल वाघमोडे, किशोर शिवणकर, अशोक केदार, लक्ष्मण शिरसकर या टीमने, शिक्रापूर तळेगाव-ढमढेरे रस्त्याच्या लगत असलेल्या, लक्ष्मी मंदिराच्या जवळ जाऊन तेथे संशयितपणे आढळून आलेल्या एम एच ०२ बि सि ०००८ या होंडा सिटी मोटारीची झडती घेतली असता, मोटारीमधील वैभव आदक या युवकाजवळ एक गावठी बनावटीचे पिस्तुल, एक जिवंत काडतूस, डीक्कीमध्ये एक धारदार सुरा अशी हत्यारे मिळून आली. दरम्यान, पोलिसांनी सर्व हत्यारे व मोटार जप्त करत वैभव आदक या युवकाला ताब्यात घेतले.
   याबाबत पोलिस शिपाई निखील रावडे (रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी वैभव संभाजी आदक (वय २३ वर्षे, रा. अभिलाषा सोसायटी, तळेगाव ढमढेरे, ता. शिरुर, जि. पुणे, मूळ रा. पठारेवाडी, अष्टापूर, ता. हवेली, जि. पुणे) याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन अतकरे व पोलिस नाईक सागर कोंढाळकर हे करत आहेत.
     शिक्रापूर पोलिसांनी अटक केलेला सराईत गुन्हेगार वैभव आदक, याचेवर यापूर्वीही कंपनीचे ठेकदार तसेच अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी वसूल करण्याचे अनेक गुन्हे आहेत. 
     या व्यक्तीने जर आणखी कोणाला खंडणी मागितलेली असेल तर शिक्रापूर पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी जनतेला केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *