तृतीयपंथ्यांसाठी महानगरपालिकेची विशेष कोविड लसीकरण मोहीम…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि. ९ जुलै २०२१ :-
आम्ही पण समाजाचा घटक आहोत, आम्हाला पण समाजात चांगले जगण्याचा हक्क आहे. कोविड लसीकरणासाठी पुढाकार घेवून महानगरपालिकेने आम्हाला आमचा हक्क दिला याबद्दल आम्ही अतिशय आनंदीत आहोत, अशी भावना तृतीयपंथी दलजीतसिंग यांनी व्यक्त केली. कोविड लसीकरणाचे महत्व महापालिकेच्या वैद्यकीय अधिका-यांनी समजावून सांगितल्याने आम्ही लसीकरण करुन घेतले असून कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी इतरांनीही लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन देखील त्यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज ट्रान्सजेंडर घटकासाठी विशेष कोविड लसीकरण मोहिम राबविण्यात आली. पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. ट्रान्सजेंडर समूहाने स्वयंप्रेरणेने या लसीकरण मोहीमेत सहभाग घेतला. महापालिकेने दिलेल्या आदराच्या वागणुकीमुळे समाधान देखील त्यांनी व्यक्त केले. अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संगिता तिरुमणी, डॉ. करुणा साबळे यांच्या उपस्थितीत ही लसीकरण मोहीम पार पडली.

कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी कोविड लसीकरण प्रभावी असल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी पटवून दिल्याने आम्ही सहका-यांसह या लसीकरण मोहिमेत सहभाग घेण्याचा निर्णय घेतल्याचे दलजीतसिंग यांनी सांगितले. आम्ही दुकान मागायला जातो त्यावेळी व्यक्तींशी संपर्क येणे साहजिक आहे. अशावेळी कोरोना संसर्गाचा धोका अधिक असतो. आम्ही आता लसीकरण केल्याने आमच्यामध्ये कोरोना पासून सुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे. इतरांनी देखील लसीकरणाचे महत्व ओळखून लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन दलजीतसिंग यांनी केले.

Advertise

महापालिकेने आम्हाला चांगली वागणूक देऊन आमच्या उत्तम आरोग्याचा विचार करुन कोविड लसीकरण मोहिम राबविली याबद्दल ट्रान्सजेंडर प्रतिनिधी किरण हुबळीकर, पुजा आंभोरे, पंकज बोकील, विश्वनाथ जैस्वाल आदींनी महापालिका प्रशासनाचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *