पिंपरी पालिकेची फसवणूक केलेल्या दोन ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल आयुक्त राजेश पाटील यांच्या आदेशावर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची धडक कारवाई…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि ५ जुलै २०२१
निविदेसाठी अनुभवाचा खोटा दाखल घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची फसवणूक केल्याचा गुन्हा पिंपरी पोलिसांनी आज दाखल केला. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी या थेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्याविरुद्ध फौजदारी करण्याचा दिला होता. महापालिकेच्या आयुक्तांच्या आदेशानंतर तातडीने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडून कार्यवाही झाली आहे.
खराळवाडी राजेश इंजिनिअरिंग अँड कंपनीचे मालक रेवजी सहादू घाटगे (वय ६९)आणि बिबवेवाडी पुणे येथील संजीव प्रेसिजनचे मालक संजीव यशवंत चिटणीस (वय ६५) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपी ठेकेदारांची नावे आहेत. याअगोदर पाटील यांनी बनावट एफडीआर देऊन पालिकेला लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या १८ ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले आहे. यातील १० जणांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत.
आज त्यांनी आणखी दोन ठेकेदारांवर फौजदारी केल्याने महापालिकेच्या सर्व ठेकेदार मंडळींचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, अनुभवाचे खोटे प्रमाणपत्र या ठेकेदारांना देणारेही अडचणीत आले आहेत. महापालिकेचे काही अधिकारीही या प्रकरणात सामील असल्याचा संशय आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने आपली जबाबदारी पार पाडली आहे. मात्र, पोलिसांकडून गुन्हा नोंदवल्यानंतरची पुढील कारवाई झालेली नाही. आजच्या गुन्ह्यातील आरोपीनाही अटक झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले . या दोन्ही प्रकरणात महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे दोन वेगवेगळे कार्यकारी अभियंते फिर्यादी आहेत.

Advertise


चिटणीस या कंत्राटदाराने पुणे महापालिकेच्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्राचे काम केल्याचा खोटा अनुभवाचा दाखला देऊन पिंपरी महानगरपालिकेचे काम मिळवले आहे. विद्युतचे कार्यकारी अभियंता यांच्याकडून त्यांनी तो घेतलेला आहे. पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरीन गॅस सिलिंडर साठवणुकीसाठी शेड बांधणे, दहा तास क्षमतेचे क्लोरीनेटर्स पुरवणे आदी कामाचा अनुभव असल्याचा खोटा दाखला त्यांनी पिंपरी महानगरपालिकेचे टेंडर मिळवण्यासाठी दिला होता. तर , दुसरीकडे पाणी पुरवठा कंत्राटदार घाटगेने पिंपरीतील हिंदुस्तान अँटिबायोटिक या केंद्र सरकारच्या कंपनीचे काम केल्याचे बनावट अनुभव प्रमाणपत्र देऊन पिंपरी पालिकेचे एक कोटी रुपयांचे काम मिळवले होते.
आयुक्त राजेश पाटील यांच्या या धडाकेबाज कारवाई नंतर महापालिका वर्तुळातील ठेकेदारांनी आता धास्ती घेतल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *