निगडीतील उड्डाणपुलाचे उद्घाटन म्हणजे अस्तित्व गमावलेल्या राष्ट्रवादीची स्टंटबाजी – सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी चिंचवड – दि. ३० जुन २०२१
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने निगडी येथील भक्ती शक्ती चौकात उभारलेल्या उड्डाणपुलाची किरकोळ कामे अजुनही बाकी आहेत. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसने स्टंटबाजी करण्यासाठी या उड्डाणपुलाचे उद्घाटन केले आहे. महानगरपालिकेची आगमी निवडणूक जवळ आल्यामुळे राष्ट्रवादीने नसलेले अस्तित्व दाखविण्यासाठी हा उद्घाटनाचा आटापिटा केला आहे. अशी टीका सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केली आहे.
यासंदर्भात सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्तेत आल्यानंतर भाजपाने पहिल्याच वर्षी निगडी येथील भक्ती शक्ती चौकात वर्तुळाकार उड्डाणपुल व ग्रेडसेपरेटर उभारण्याच्या कामाला मंजुरी दिली. त्यानंतर या उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळाली. आता या उड्डाणपुलाचे काम पुर्ण झाले असुन किरकोळ कामे अजुनही होणे बाकी आहे. या उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्यात आले आहे. कोरोनामुळे या उड्डाणपुलाच्या काही कामांना विलंब झाला राहिलेली किरकोळ कामे पुर्णत्वाच्या मार्गावर आहेत. या उड्डाणपुलाच्या येथे म्युरल्स बसविण्यात येणार आहेत त्याचे काम अजुन बाकी आहे. उड्डाणपुलाला रंगरगोटी करण्याचे काम अद्याप झालेले नाही. रस्त्यावर पांढरे पट्टे मारणे बाकी आहे. तसेच पुलावर एका बाजुचे फुटपाथचे काम झालेले नाही. ही कामे झाल्यानंतर उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. निगडी उड्डाण पुलाचे काम भाजपाच्या काळात सुरु झाले आणि ते काम साडेतीन वर्षात पुर्णही झाले. राष्ट्रवादीप्रमाणे ठेकेदार हित न जोपासता व कुठलाही वाढीव खर्च न करता भाजपाने हे काम पुर्ण केले याचे राष्ट्रवादी काँग्रेसने आत्मचिंतन करावे.

Advertise


असे असताना सत्तेविना तडफड होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्टंटबाजी करण्यासाठी म्हणून या उड्डाणपुलाचे उद्घाटन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा भ्रष्ट कारभार पिंपरी चिंचवडकरांनी १५ वर्ष सहन केला. या सहनशिलतेचा अंत झाला म्हणून याच पिंपरी चिंचवडकरांनी भ्रष्टवादी राष्ट्रवादी काँग्रेसला २०१७ च्या महापालिका निवडणूकीत जागा दाखवली. गेल्या साडेचार वर्षात विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादीला एकही चमकदार काम करता आले नाही म्हणून महापालिकेची आगामी निवडणूक जवळ आल्याने राष्ट्रवादीला अशी स्टंटबाजी करावी लागत आहे. अशा प्रकारे कितीही स्टंटबाजी केली तरी पिंपरी चिंचवडकर आपला विचार बदलणार नाहीत हे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ध्यानात घ्यावे. भाजपाने महापालिकेत प्रथमच सत्तेत येवुन चांगले काम केले आहे. निगडीतील उड्डाणपुल हे त्या चांगल्या कामापैकी एक काम असल्याचे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *