पवारसाहेबांचा निषेध म्हणजे विरोधकांना सूचलेले सूडबुध्दीचे राजकारण – सूर्याकडे पाहून थुंकी उडवणा-यांना कदाचित माहिती नसेल..- माजी आमदार विलास लांडे.

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी – दि ३० जून २०२१
बालेवाडीतील आंतरराष्ट्रीय क्रिडा विद्यापीठात उभारण्यात आलेल्या ‘सिंथेटिक ट्रॅक’वर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गाड्यांचा ताफा गेल्यामुळे विरोधकांनी स्वतःला क्रिडा क्षेत्रातील तज्ञ माणून निषेध व्यक्त करत स्वतःचे अज्ञान चव्हाट्यावर आणले आहे. क्रिडा विश्वाची विशेष आवड असल्याने शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिडा विद्यापीठ पुणे शहरात आणले. याच्या माध्यमातून पुण्यात क्रिडा विश्वाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्याकडून क्रिडा नियमांचं उल्लंघन कदापी होणार नाही. कारण, पवारसाहेबांनी कित्येक वर्षे ‘आयसीसी’च्या अध्यक्ष पदावर राहून क्रिडा क्षेत्राचा देशभरातच नव्हे तर देशाच्या बाहेरसुध्दा विस्तार केला आहे. त्यांच्या पायाला जखम झाल्यामुळे क्रिडा आयुक्तांनीच त्यांच्या गाड्यांच्या ताफ्याला ‘सिंथेटिक ट्रॅक’वर प्रवेश करण्याची परवानगी दिली. त्यामुळे या शूल्लक बाबीचा निषेध करणा-या विरोधकांच्या सूडबुध्दीची किव येते, अशा शब्दांत माजी आमदार विलास लांडे यांनी विरोधकांचे वाभाडे काढले आहे.

तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आणि राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या कार्यकाळात शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेण्यासाठी अनुकूल ठिकाणी क्रिडा मैदान तयार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. त्यावेळी पवारसाहेबांनी महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत ही दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिडा मैदान तयार करण्यासाठी पुण्यातील बालेवाडी येथे जागा उपलब्ध करून दिली. तो प्रस्ताव तातडीने मंजूर करून तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी कामाला गती दिली. पवारसाहेबांनी स्वतः लक्ष घालून याठिकाणी भव्यदिव्य असे आंतरराष्ट्रीय क्रिडा मैदान तयार केले. त्यावेळी मी पिंपरी-चिंचवडचा महापौर असताना महापालिकेच्या माध्यमातून स्टेडियमच्या कामासाठी लागणारे सहकार्य केले. मी आणि तत्कालीन आयुक्त श्रीनिवास पाटील आम्ही दोघांनी स्टेडियमच्या बांधकामासाठी पाण्याची व्यवस्था करून दिली. पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था कशी करता येईल, याचा विचार करून तो प्रश्न सोडवला. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिडा स्पर्धा होत असताना खेळाडूंना लागणा-या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पवारसाहेबांच्या मार्गदर्शनानुसार सहकार्य केले. आज याठिकाणी होणा-या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिडा स्पर्धांपासून राज्यातील असंख्य खेळाडूंना प्रेरणा मिळते. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील शेकडो खेळाडू घडवण्यासाठी हे स्टेडियम प्रेरणादायी ठरत आहे, असे लांडे यांनी म्हटले आहे.

Advertise

2004 मध्ये पवारसाहेब ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष झाले. त्यांनी बरीच वर्षे या पदावर राहून क्रिकेट विश्वाचा विस्तार केला. त्यानंतर 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाचे (आयसीसी) अध्यक्ष झाले. ‘टी 20’ (इंडियन प्रिमीयर लिग) ही त्यांच्याच संकल्पनेतून सुरू झाली. जागतीक पातळीवर नामांकित असे सामने खेळले गेले. क्रिकेटसोबतच कुस्ती, कबड्डीसारख्या देशी खेळांच्या संघटनांमध्ये, व्यवस्थापनामध्येही त्यांनी महत्वाच्या भूमिका बजावल्या. 2019 मध्ये राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी पवारसाहेबांची बिनविरोध निवड झाली. भारतातल्या मातीतल्या कबड्डीला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्याचं श्रेय पवारसाहेब आणि कब्बडीमहर्षी बुवा साळवी यांना जाते. बुवा साळवी यांनी आपलं आयुष्य कबड्डीसाठी वाहून घेतलं आणि पवारसाहेबांनी त्यांना भक्कम साथ दिली. त्यांच्याच प्रयत्नातून हा ‘देशी’ खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहोचला. आशियायी स्पर्धांमध्ये कबड्डीला स्थान मिळवून देण्यात या दोघांची निर्णायक भूमिका राहिली. 1973 साली शरद पवारांच्या नेतृत्वाखाली ‘अमॅच्युअर कबड्डी फेरडेशन ऑफ इंडिया’ या संघटनेची स्थापना करण्यात आली. पवारसाहेब हे संघटनेचे अध्यक्ष झाले. राष्ट्रीय पातळीवरील कबड्डीला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यासाठी पवारसाहेबांनी १९७८ मध्ये ‘एशिअन अमॅच्युअर कबड्डी असोसिएशन’ची स्थापना केली आणि या संघटनेच्या माध्यमातून आशियायी देशांमध्ये कबड्डीचा प्रचार आणि प्रसार केला. पवारसाहेबांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. परिषदेचे तत्कालीन सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांची त्यांना खंबीर साथ होती. पवारसाहेबांनी कुस्तीसाठी घेतलेले कष्ट त्यांनी जवळून पाहिले आहेत. 1972-73 ला मुंबई तालिम संघाचे पवारसाहेब अध्यक्ष राहिले आहेत. कुस्ती क्षेत्रातील त्यांचं योगदान अफाट आहे. मातीतली कुस्ती मॅटवर घेऊन जाण्यात पवारसाहेबांनी प्रयत्न पनाला लावले. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन भोसरीत सुध्दा शेकडो पैलवान व क्रिडापट्टू तयार झाले आहेत. याठिकाणी होणारं आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुध्दा पवारसाहेबांच्या कल्पनेतून साकारणारा प्रेरणादायी प्रकल्प आहे, असे असंख्य दाखले लांडे यांनी विरोधकांच्या पुढे ठेवले आहेत.

क्रिडा क्षेत्राची जाण नसणा-यांनी स्वतःची कुवत ओळखून बोलावे – लांडे

बालेवाडी येथील स्टेडिअयच्या धावपट्टीवर गाड्यांचा ताफा गेल्यामुळे पवारसाहेबांवर विरोधकांनी टिका करणे म्हणजे सूर्याकडे पाहून थुंकी उडवण्यासारखे आहे. ती थुंकी स्वतःच्या तोंडावर पडणार हे विरोधकांना कदाचित माहिती नसावे. क्रिडा क्षेत्रात आपले शून्य योगदान असल्याची जाणीव विसरलेल्या विरोधी पक्षाच्या पदाधिका-यांनी स्वतःची कुवत ओळखून बडबड करावी. नको तिथे आपली बुध्दी पाजळण्याचा उद्योग केल्यास स्वतःलाच तोंडघशी पडावे लागणार आहे. याचा निषेध करणे म्हणजे स्वतःचे अज्ञान चव्हाट्यावर आणण्याचाच प्रकार आहे. क्रिडा विश्वाला गती देणारा व्यक्ती क्रिडाविषयक नियमांचे उल्लंघन कसे करू शकेल, हे विरोधकांना सांगून कळणार नाही. एवढे न समजण्याइतपत विरोधक अज्ञानी असतील याची कल्पना मनाला न पटणारी आहे. केवळ पायाला जखम झाल्यामुळे पवारसाहेबांनी सिंथेटिक ट्रॅकवरती गाड्यांच्या ताफ्याला परवानगी मागितली होती. त्यावर क्रिडा आयुक्तांनी परवानगी दिल्यानंतरच गाड्यांचा आतमध्ये प्रवेश झाला. याचा निषेध करणे म्हणजे राजकीय सूडबुध्दीतून सूचलेले विकृत शहानपण म्हणावे लागेल, अशी टिका लांडे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *