शिवछत्रपतींच्या पादुकांचे झाले दिमाखात प्रस्थान…

ओझर प्रतिनिधी: मंगेश शेळके

दि.२४ जून २०२१ (ओझर ): भागवत परंपरेच्या दृष्टीने आत्यंतिक महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पादुकांनी शिवजन्मभूमी शिवनेरीहून स्वराज्य राजधानी रायगडच्या दिशेने प्रस्थान केले. श्रीशिवछत्रपतींच्या पादुकांवर पवमान अभिषेक व रुद्राभिषेक झाल्यानंतर शिवाई देवीची महापूजा बांधून, महाद्वार पूजन झाल्यानंतर सोहळा रायगडच्या दिशेने प्रतिकात्मक १ हजार पावले चालून पुढे वाहनाने मार्गस्थ झाला.
शिवनेरीहून निघालेल्या पादुका मंचर, खेड, पुणे मार्गे श्रीशंभुराजांच्या जन्मभूमी असलेल्या गड पुरंदरी विसावा घेऊन पुढे राजाभिषेक महोत्सवासाठी रायगडला पोहोचतील. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ शिवभक्त शिवाई देवीच्या चरणांशी विसावलेल्या पादुका घेऊन, प्रस्थान पूजा करुन नारायणगाव मार्गे आपल्या तालुक्यातून पुढे गेले.

आषाढी वारीच्या निमित्ताने भक्तिसागरात सामील होण्यासाठी निघालेल्या या शक्तिपरंपरेतील शिवरायांच्या पादुका दरवर्षी शिवनेरी, संग्रामदुर्ग, मल्हारगड, पुरंदर, रायरेश्वर असा प्रवास करून रायगडला जातात. राजाभिषेकापासून पुढील ५ दिवस रायगडावरच विसावा घेऊन ज्येष्ठ वद्य चतुर्थीला श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवतात. आषाढी वारी पूर्ण झाल्यानंतर पुढील वर्षभरासाठी या पादुका शिवजन्मभूमीत परत येत असतात. शिवछत्रपतींच्या पालखी सोहळ्याचे हे यंदाचे ७ वे वर्ष आहे.

कोरोना महामारीमुळे शासकीय प्रतिबंधात्मक नियम कठोर असल्याने, शिवाई देवीच्या चरणांशी असलेल्या शिवछत्रपतींच्या पादुका घेऊन जाण्याची सेवेची संधी यावर्षी योगऋषी सुधीर इंगवले, ऍड. भाऊसाहेब शिंदे, ऍड. राहुल कदम, ह.भ.प. साहिलबुवा शेख व पलाश देवकर यांना मिळाली आहे.

कोरोना काळातही सर्व नियम-निर्बंध पाळून सोहळ्यास यशस्वी करण्यासाठी स्थानिक पातळीवर संदीपशेठ ताजणे, नेत्राली ताजणे, संतोष परदेशी, कल्पेश परदेशी, केदार पुरवंत, हर्षवर्धन कुर्हे, सुशांत शिंदे, सूरज खत्री यांनी परिश्रम घेतले. तर आवश्यक त्या परवानग्या मिळण्यासाठी पुरातत्व विभागाचे अधिकारी श्री. जंगले, श्री. दाभाडे, श्री. बोचरे तसेच शिवाई देवीचे पुजारी सोपानजी दुराफे, स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास जाधव, श्री. लोहकरे, गणेश जोरी, वनविभागाचे श्री. शिंदे व त्यांचे सहकारी या सर्व शासकीय व स्थानिक मंदिर संस्थानचे सहकार्य लाभले.

Advertise

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *