शिरूरच्या सिद्दीच्या पहाडावर वृक्षप्रेमींनी लावलेल्या अनेक रोपट्यांची, काही अज्ञातांनी पुन्हा एकदा केली कत्तल…

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
शिरूर : दि. 22/06/2021.

शिरूर शहरालगत सिद्धीचा पहाड नावाची टेकडी असून, ती वनविभागाच्या अखत्यारीत येते. काही वर्षांपूर्वी वनविभागाने या जमिनीला वॉल कंपाऊंड बांधले. दोन तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील काही भागांत दुष्काळ पडला होता. त्याच्या झळा शिरूरकरांनाही बसल्या होत्या. त्यामुळे काही वृक्षप्रेमी एकत्र येत, जनविकास फौंडेशन व सिद्धेश्वर वनीकरणच्या सभासदांनी, या सिद्दीच्या पहाडावर वृक्षलागवड करण्यास सुरुवात केली. त्यांना शिरूरकरांनी, नगर पालिकेने व वनविभागानेही चांगले सहकार्य केले. सुरुवातीला तर येथे फिरायला येणाऱ्या लोकांनी व वृक्षप्रेमींनी, स्वतःच्या घरून बॉटल मध्ये सकाळ व संध्याकाळ असे दोन वेळा पाणी आणून, या रोपांना ते पाणी देऊन जगविले. हा सिद्धीचा पहाड शिरूरलगत असल्याने, लोकांना व्यायाम व फिरण्यासाठी खूप जवळ आहे. याच्या बाजूलाच प्रीतमप्रकाश नगर, पाषाण मळा, बाबुराव नगर, हुडको कॉलनी असा लोकवस्तीचा भाग आहे.

येथे वनविभागाचे सुमारे ८० एकर क्षेत्र आहे. तीन वर्षांपूर्वी ही टेकडी पूर्णतःओसाड होती. मात्र या सर्व वृक्षप्रेमींनी व समितीच्या सदस्यांनी केवळ वृक्षारोपणच नव्हे, तर वृक्षसंवर्धनाचा ध्यास मनी घेतल्याने, स्वप्नातील स्वर्ग येथे निर्माण होऊ लागला. हळूहळू झाडांची संख्या वाढू लागली. दररोज सकाळी व संध्याकाळी समितीचे सदस्य टेकडीवर येऊन झाडांची नित्य नियमाने काळजी घेऊ लागले. वृक्षप्रेमींच्या या कष्टामुळे, एकेकाळी ओसाड दिसणारी सिद्धेश्वर टेकडी हळूहळू हिरवीगार दिसायला लागली. गेल्या तीन वर्षांची परिस्थिती पाहता सिद्धेश्वर वनीकरण समितीच्या सदस्यांनी, या टेकडीवर पाच हजार झाडे लावल्याचे आशादायक चित्र आहे. सर्वांच्या सहकार्याने येथे ऑक्सिजन पॉईंट तयार होत आहे. कोरोनाच्या काळात ऑक्सिजन ला असणारे महत्व सर्वांनाच कळलेले आहे.

वृक्षसंवर्धन समितीच्या सदस्यांनी स्वकष्टाने हजारो वृक्ष लावत त्यांची उत्तम जोपासना केली. आता सध्या येथे पाच हजार रोपटी व वृक्ष वाढत आहेत. सुरुवातीला बादल्यांनी व पाण्याच्या बॉटल ने लोकांनी यांना पाणी घालत, जीवापाड जपत यांची वाढ केली. पुढे, शिरूर नगर पालिकेच्या याच टेकडीजवळ असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या वेस्ट पाण्याचा वापर केला. ठिबक करून ती झाडे जोमात वाढू लागली. त्यासाठी शिरूर नगर परिषदेचे मोलाचे सहकार्य लाभले.

Advertise

पुढे समितीच्या सदस्यांनी वृक्षप्रेमींना आपापल्या वाढदिवस व काही कार्यक्रमानिमित्त येथे वृक्ष लागवडीस प्रोत्साहन दिले. काहींनी त्यानिमित्त पाण्याच्या टाक्या, ठिबक सिंचन संच, व अन्य उपयोगी वस्तू देणगी स्वरूपात दिल्या. आज तीन ते चार वर्षांत येथे नंदनवन दिसू लागले आहे.
मात्र येथे दोनदा आगी लावण्यात आल्यात तर अनेकदा वृक्षांची कत्तल होत आहे. त्यामुळे येथे श्रमदान करत या जीवांना जगविणाऱ्या वृक्षप्रेमींच्या डोळ्यात पाणी येत असून, शिरूरकरही हळहळ व्यक्त करत आहेत. आपला आवाज चॅनेलनेही अनेकदा, या सिद्धेश्वर वनीकरणाच्या वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन तसेच अज्ञातांनी येथे लावलेल्या आगी व वृक्षांच्या केलेल्या कत्तलीच्या बातम्या वेळोवेळी प्रसिद्ध केल्या आहेत.

  मात्र एवढ्या कष्टाने जोपासलेल्या या झाडांची, विनाकारण कुणीतरी कत्तल करत आहे. या रोपट्यांनी जसा जीव धरलाय, तशी गेल्या काही महिन्यापासून या टेकडीवरील झाडांची कत्तल होऊ लागलेली आहे. झाडांची कत्तल होऊ लागल्याने समितीचे सदस्य अस्वस्थ होऊ लागले आहेत. रात्रीच्या अंधारात कोण कत्तल करीत आहे याचा त्यांना थांगपत्ता लागेनासा झालाय. गेल्या सहा महिन्यात वड पिंपळ तसेच उंबर या प्रकारची शंभराहून अधिक झाडांची कत्तल झालेली आहे. हा प्रकार अतिशय क्लेशदायक व संतापजनक असून, समितीच्या सदस्यांनी याचा तीव्र निषेध केला आहे. यासंदर्भात सोमवार दि. २१ जून २०२१ रोजी, समितीच्या सदस्यांनी शिरूरच्या तहसीलदारांना निवेदन देत, झाडांची कत्तल करणाऱ्या अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याची, तसेच या टेकडीवर सकाळी व रात्री गस्त घालण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी, समितीचे सदस्य तुषार वेताळ, संतोष साळी, डॉ. सुरेंद्र डोंगरे, डॉ. अतुलकुमार बेद्रे, योगेश देशमुख, लक्ष्मण डोके, बाळासाहेब थेटे, राज पारखे, अमोल शिंदे आदींच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. निवासी नायब तहसीलदार श्रीशैल व्हट्टे यांनी निवेदन स्वीकारले.

  शिरूर शहरातील वृक्षप्रेमींनी वृक्षारोपण व त्याचे जतन करण्यासाठी दत्तक घेतलेल्या सिद्धेश्वर टेकडीवरील, मोठ्या कष्टाने संवर्धन केलेल्या शंभराहून अधिक झाडांची अज्ञात व्यक्तींकडून कत्तल करण्यात आलेली आहे. हे वृक्ष कत्तल करणाऱ्या या नकारात्मक प्रवृत्तीचा सिद्धेश्वर समितीने व शिरूरकरांनी तीव्र निषेध केला असून, याबाबत गुन्हा दाखल करावा तसेच असा प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी या टेकडीवर शासकीय यंत्रणेकडून गस्त घालण्याची व येथे सी सी कॅमेरे बसविण्याची मागणी, समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे.

चार पाच दिवसांपूर्वीच शिरूर हवेलीचे आमदार, ऍड अशोक पवार यांच्या अध्यक्षतेखाली शिरूर तहसील कार्यालयाच्या सभागृहात, वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनासंबंधी बैठक झाली होती. त्यास प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार श्रीमती एल डी शेख, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, प्रभारी तालुका कृषी अधिकारी एस व्ही भारती, सामाजिक वनीकरण विभागाच्या तालुकाधिकारी श्रीमती तनुजा शेलार, शिरूर नगर परीषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, शिरुरचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे व तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळीही तुषार वेताळ यांनी सिद्दीच्या पहाडावरील वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन व येथे काही समाज कंटकांकडून होणाऱ्या वृक्षांच्या कत्तली व लावलेल्या आगीची माहिती दिली होती. तसेच येथे सी सी कॅमेरे बसविण्याची किंवा रखवालदार नेमण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर विचार व अंमलबजावणी होतेय ना होतेय तेवढ्यात, पुन्हा एकदा काही समाजकंटकांनी पुन्हा येथील वृक्षांच्या कत्तली केल्यात.
त्यामुळे, आता शासन व प्रशासन नेमके काय ध्येय धोरण ठरवतेय, याकडेच सर्व शिरूरकरांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *