पै. मंगलदास बांदल यांच्या अडचणीत वाढ : पुन्हा वाढली पोलीस कोठडी…

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
शिरूर : दि. 19/06/2021.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष तथा पुणे जिल्हा परिषदेचे, माजी बांधकाम समिती सभापती, तसेच शिरूर तालुक्यातील एक मोठी ग्राम पंचायत म्हणून ओळख असलेल्या शिक्रापूर मधील एक धुरंधर राजकारणी म्हणून अवघ्या महाराष्ट्राला ओळख असणारे, तसेच आपल्या वक्तृत्व शैलीने सर्वांना भुरळ पडणारे, पै. मंगलदास विठ्ठलराव बांदल यांच्या पोलीस कोठडीत आणखी वाढ झाल्याने, ते आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात पुरते अडकलेले दिसत आहे. त्यामुळे राजकीय गोटात कमालीची खळबळ उडालेली आहे.

याआधी शिरूर पोलिस ठाण्यातील पोलीस कोठडीत त्यांना तब्बल १४ दिवस राहावे लागलेले होते.
पुण्याच्या शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेतील बनावट कर्ज प्रकरण व बॅंकेचे 50 लाख रुपये आपल्या खात्यात टाकल्याप्रकरणी, पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने, गुरुवार दि. १७ जून २०२१ रोजी

बांदल यांना अटक करत, न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २५ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

Advertise

शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या आर्थिक घोटाळ्यामध्ये, बांदल यांचाही सहभाग असल्याचे पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासामध्ये निष्पन्न झाले होते. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेकडूनही, बांदल यांना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सतीश वाळके, यांच्या पथकाने गुरुवारी बांदल यांना येरवडा कारागृहातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना विशेष न्यायालयामध्ये हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेमध्ये बांदल यांनी बनावट कर्ज प्रकरणे दाखल करुन, कर्ज लाटण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर संबंधीत बॅंकेचे ५२ लाख रुपये, बांदल यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा करण्यात आले असल्याचे निष्पन्न झाले होते. याच पार्श्‍वभूमीवर, पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बांदल यांना अटक केली आहे.

काही महिन्यांपूर्वी पुण्यातील एका बड्या सराफी व्यावसायिका कडेही, खंडणी मागण्याच्या प्रकरणामध्ये मंगलदास बांदल यांना पुणे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेले होते.

त्यानंतर शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलिस ठाण्यातही, फसवणूक प्रकरणी दाखल झालेल्या एका गुन्ह्यात, पुणे ग्रामीण पोलिसांनी बांदल यांना २६ मे रोजी अटक केलेली होती. त्या गुन्ह्यात त्यांना १ जून पर्यंत पोलिस कोठडीत राहावे लागले होते. ही कोठडी पूर्ण होण्याआधीच, दरम्यानच्या काळात बांदल यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झालेला होता. त्या प्रकरणात बांदल यांना तीन जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलेली होती.

या प्रकरणाचा तपास चालू असतानाच, रवींद्र सातपुते यांच्या तक्रारीवरून ८ जून पर्यंत त्यांना पोलिस कोठडीत राहावे लागलेले होते.
बांदल यांना ८ जून रोजी तीनही गुन्ह्यांत, शिरूर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावलेली होती. तेव्हापासून बांदल यांना येरवडा कारागृहामध्ये ठेवण्यात आलेले होते.

   दरम्यान, शिरूर पोलीस ठाण्यातील १४ दिवस आणि पुणे शहर पोलिस ठाण्यातील ८ दिवस, असे तब्बल २२ दिवस पै. मंगलदास बांदल यांचे पोलिस कोठडीत जाणार असल्याने, त्यांच्या समोरील अडचणी आणखी वाढलेल्या दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *