रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी- दि १७ जून २०२१
महापालिकेच्या औंध रावेत रस्त्यावरील ड क्षेत्रीय कार्यालयास आज आयुक्त पाटील यांनी भेट देऊन प्रभाग क्र. २५ आणि २६ मधील कामे तसेच विविध उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. प्रभाग क्र. २५ आणि २६ मधील विविध समस्या, अतिक्रमण, पावसाळी कामे, कोरोना विषयक नियोजन तसेच हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती, अशा विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली. बैठकीस ड प्रभाग अध्यक्ष सागर आंगोळकर, नगरसदस्या ममता गायकवाड, आरती चौंधे, रेखा दर्शले, अश्विनी वाघमारे, नगरसदस्य राहुल कलाटे, मयूर कलाटे, संदीप कस्पटे, तुषार कामठे, सहशहर अभियंता अशोक भालकर, ड क्षेत्रीय अधिकारी सुषमा शिंदे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, अनिल शिंदे, विलास देसले, सुनिल वाघुंडे, अनिल सुर्यवंशी आदींसह स्थापत्य, विद्युत, स्थापत्य क्रीडा, पाणीपुरवठा, बांधकाम परवानगी, नगररचना, स्थापत्य उद्यान, झोनिपु स्थापत्य, आरोग्य, जलनि:सारण, अतिक्रमण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक २५ आणि २६ मधील भाग शहराच्या दृष्टीने महत्वाचा आहे. या परिसरात विकसित झालेल्या रस्त्यांच्या सौंदर्यीकरणावर भर दिला जाणार असून आकर्षक वृक्षारोपण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या परिसरातील बरेचसे रस्ते रहदारीयुक्त आहेत मात्र अनेक रस्त्यांवर फेरीवाले तसेच काही दुकानदारांनी अतिक्रमण केल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. त्यावर तातडीने कारवाई करुन फुटपाथ अतिक्रमणमुक्त करा असे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी प्रशासनाला दिले. अशा अतिक्रमणांवर नियमित लक्ष ठेवून तात्काळ कारवाई करावी असे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले. हॉकर्सचे नियोजन करुन त्यांना योग्य ठिकाणी स्थलांतरीत करणे आवश्यक आहे. शहर पातळीवर यासाठी ३ प्रभागांमध्ये मॉडेल स्वरुपात व्यवस्थापन सुरु असून त्यानुसार इतर ठिकाणी हॉकर्सचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे अशी माहिती आयुक्त पाटील यांनी दिली.
यावेळी बैठकीत नगरसदस्यांनी विविध सूचना मांडल्या. वाकड मधील भाजी मंडई विकसित करावी, संथगतीने चालू असलेल्या पाण्याच्या टाकीचे काम लवकर पूर्ण करावे, कस्पटेवस्ती ते वर्धमान सोसायटी दरम्यान रस्त्यांचे काम पूर्ण करावे, स्मार्ट सिटी आणि महापालिका यांचा कामामध्ये समन्वय असावा, पिंपळे निलख येथे विरंगुळा केंद्र उभारावे, रक्षक सोसायटीकडून बाणेरकडे जाणारा रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण करावे, खेळाच्या मैदानासाठी असलेले आरक्षण विकसित करावे, शहीद अशोक कामठे उद्यानाचे काम पूर्ण करावे, पिंपळे निलख मधील व्यापारी गाळ्यांचा नव्याने लिलाव करावा, पिंपळे निलख मधील शिक्षक सोसायटीजवळ असलेल्या नदीलगतचा भराव काढून घ्यावा, फुटपाथवरील फेरीवाल्यांनी तसेच दुकानदारांनी केलेले अतिक्रमणावर कारवाई करावी, रस्त्यावरील खड्डे बुजवावे, वाकड मधील नवीन जलशुध्दीकरण केंद्राची उभारणी करावी, भुजबळवस्ती आणि विनोदे वस्ती भागात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा, पुनावळे परिसरात रस्ते विकसित करावे आदी सूचना यावेळी मांडण्यात आल्या. बैठकीत आलेल्या सूचना आणि मुद्दयांबाबत तसेच झालेले, चालू असलेले आणि भविष्यात हाती घेण्यात येणा-या प्रकल्पांच्या कामांबाबत आयुक्त पाटील यांनी संबंधित अधिका-यांकडून माहिती घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. प्रभाग स्तरावरील कोविड केअर सेंटर, फिव्हर क्लिनिक, कोविड चाचणी केंद्र याबद्दल क्षेत्रीय अधिकारी सुषमा शिंदे यांनी बैठकीत माहिती दिली.
बैठकीनंतर आयुक्त राजेश पाटील यांनी ड प्रभागातील विविध कामांची पाहणी करुन संबंधित अधिका-यांना सूचना दिल्या. मानकर चौक ते बाणेर दरम्यान असलेल्या कस्पटेवस्ती स्मशानभूमी जवळील पूलाच्या कामाची पाहणी, रक्षक चौक ते पिंपळे निलख दरम्यान लष्करी हद्दीलगत सबवेच्या कामाची पाहणी, रक्षक चौक ते पिंपळे निलख रस्ता रुंदीकरणातील जागा ताब्यात घेण्याबाबतची पाहणी आणि वाकड मधुबन हॉटेल जवळील रस्त्याची देखील त्यांनी पाहणी केली. मानकर चौक ते हिंजवडी हद्दीपर्यंत प्रस्तावित करावयाच्या उड्डाणपुलाच्या संदर्भातील स्थळ पाहणी करुन आयुक्त पाटील यांनी संबंधित अधिका-यांना सूचना दिल्या.