बिबट्याच्या हल्यात ओतूर येथील युवक गंभीर जखमी…

बातमी-प्रतिनिधी कैलास बोडके

ओतूर (ता. जुन्नर) येथील घुलेपट (उंब्रज पांध) येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारांसाठी पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती ओतूर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही घटना आज सायंकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या दरम्यान घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की घुलेपट येथील निलेश ज्ञानेश्वर घुले (वय ३३ वर्षे) हा युवक आपल्या राहत्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या शेतामध्ये शेतीच्या मशागतीची पाहणी करण्यासाठी गेला होता. त्यावेळी शेतामध्ये दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला.

बिबट्याने अचानक हल्ला केल्याने निलेश घुले घाबरुन गेला. मात्र, प्रसंगावधान राखून त्याने आरडाओरडा करत बिबट्याचा हल्ला परतवून लावला. तरीही बिबट्याने त्याच्यावर प्रतिहल्ला करुन निलेश यास गंभीर जखमी केले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यावेळी बिबट्याने निलेश याच्या शरीरावर ठीक ठिकाणी चावा घेतला आहे. अशाही स्थितीत निलेशने आरडाओरडा करुन बिबट्याला पळवून लावले. जवळपास मानवी वस्ती नसल्याने निलेशला मदत मिळू शकली नाही.
हल्ल्याची माहिती मिळताच जुन्नर पंचायत समितीचे सभापती विशाल तांबे, ओतूर वन विभागाचे वनपाल सुधाकर गिते, वनपाल गवांदे, वन रक्षक सुदाम राठोड व वन कामगार फुलचंद खंडागळे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
जखमी अवस्थेतील निलेश यास त्याच्या मित्रांनी ओतूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

Advertise

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निलेश यास वेदना शामक इंजेक्शन देऊन त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. परंतु बिबट दंशाची लस ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध नसल्याने वैद्यकीय अधिकारी यांनी निलेश यास पुणे येथील ससून रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती मिळाली आहे.
घुलेपट येथे बिबट्याचा वावर लक्षात घेता वन विभागाने या परिसरात तात्काळ पिंजरा लावावा व वीज वितरण कंपनीने त्या परिसरात पथदिवे बसवावेत अशी मागणी घुलेपट व परिसरातील नागरिकांनी केली आहे.
ओतूर परिसरात बिबट्याचे होणारे संभाव्य हल्ले लक्षात घेता ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात बिबट दंश प्रतिबंधक लस तात्काळ उपलब्ध करण्यात यावी अशी मागणी देखील ओतूर मधील नागरिकांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *