पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आयुक्त राजेश पाटील यांचे आदेश…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि. १० जून २०२१
संभाव्य पूरस्थितीचा विचार करुन पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईचे काम तातडीने पूर्ण करा असे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी संबंधित अधिका-यांना दिले.
शहरातील नाले साफसफाईच्या कामाचा आढावा आज आयुक्त राजेश पाटील यांनी घेतला. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या या आढावा बैठकीस अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, शहर अभियंता राजन पाटील, सहशहर अभियंता रामदास तांबे, श्रीकांत सवणे, अशोक भालकर, कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार, प्रशांत पाटील, दत्तात्रय रामगुडे, शशिकांत मोरे, संजय कुलकर्णी रविंद्र पवार, विजय काळे, क्षेत्रिय अधिकारी राजेश आगळे, सोनम देशमुख, सुचेता पानसरे, अण्णा बोदडे यांच्यासह सर्व क्षेत्रिय कार्यालयांचे सहाय्यक आरोग्य अधिकारी उपस्थित होते.


आयुक्त पाटील म्हणाले, पाण्याचा प्रवाह विविध कारणांनी रोखला गेल्याने पाणी तुंबले जाते. यासाठी शहरातील मुख्य नाले, ओढे, बंदीस्त नाले, उपनाले, सी.डी. वर्कस, पाईप कलव्हर्टस, गटारे यांची साफसफाईची कामे पूर्ण करावीत. पावसाळ्यातील प्राधान्याने करावयाच्या कामासाठी क्षेत्रिय अधिका-यांनी पुढाकार घेऊन विभागांतर्गत समन्वय ठेवावा. सर्वेक्षण करुन कालबध्द कार्यक्रमाची आखणी करुन सर्व साफसफाई वेळेत होईल याची काळजी घ्यावी. ज्या ठिकाणी कायम पाणी साचते त्या भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे. नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरणार नाही यासाठी त्या भागाची पाहणी करुन तात्काळ उपाययोजना करावी. अडचणीच्या ठिकाणी तसेच इतर प्राधिकरणाशी संबंधित नाले सफाईचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे समन्वय साधून मोहिम राबवावी आदी सुचना आयुक्त पाटील यांनी दिल्या.