उरवडेतील दुर्घटनेतील कंपनी मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – माजी उपमहापौर केशव घोळवे..

उरवडेतील दुर्घटननेत १८ कामगारांचा मृत्यू हे भ्रष्ट व्यवस्थेने घेतलेले बळी – माजी उपमहापौर केशव घोळवे

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि. ९ जून २०२१
उरवडे येथील एसविएस अक्वा टेक्नॉलॉजीज या रसायन कंपनीत झालेल्या दुर्घटनेत १८ कंत्राटी कामगारांच्या दुर्दैवी मृत्यूस जबाबदार असणा-या कंपनी व्यवस्थापन, ठेकेदारावर आणि परवाना देणाऱ्या सरकारी अधिका-यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर व भाजपा कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस केशव घोळवे यांनी केली आहे.

मंगळवारी दुर्घटनास्थळाला प्रत्येक्ष भेट देऊन पाहणी केली.दुर्घटनेची गंभीरता व दाहकता समजून घेतली. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून घटनेची माहिती घेतली.समवेत थरमॅक्स कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष महेंद्र पासलकर होते .

यावेळी घोळवे म्हणाले की, ही दुर्घटना म्हणजे भ्रष्ट व्यवस्थेने घेतलेला बळी असून कंत्राटी कामगार युनियन करु लागली की, मालक त्यांना कामावरुन कमी करतात. कंत्राटी कामगार घेण्याचा परवाना हा फक्त घरकाम, उद्यान काम आणि वस्तू हाताळणी (हाऊस किपींग, गार्डनिंग आणि मटेरीयल हॅण्डलींग) यासाठीच मिळतो. ठेकेदार असा परवाना काढून अकुशल कामगारांना उत्पादनाशी संबंधित व केमिकलशी संबंधीत धोकादायक काम देतात. याकडे फॅक्टरी इन्स्पेक्टर सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. यासाठी सर्व कंपन्यांचे ले आउट मंजुरी व ऑक्युपेशनाल हेल्थ सेफ्टी व पर्यावरणचे ऑडिट प्रत्यक्ष केले गेले पाहिजे.तसेच लेबर कमिशनर,फॅक्टरी इन्स्पेक्टर,एमपीसीबी या विभागांनी कामगाराच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

ही दुर्घटना म्हणजे केवळ अपघात नसून कंपनी व्यवस्थापन, फॅक्टरी इन्स्पेक्टर आणि भ्रष्ट सरकारी व्यवस्थेने १८ कामगारांचा बळी घेतला आहे. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या कंत्राटी कामगारांची ठेकेदाराच्या अनुज्ञाप्तीमध्ये नोंद होती का ? त्यांना कंत्राटी कामगार म्हणून मिळणा-या सुविधा मिळत होत्या का ? या कामगारांना रसायनाशी संबंधित धोकादायक काम कसे काय दिले ? याची सखोल चौकशी झाली पाहिजे.

मागील वर्षात किमान १०० हुन जास्त अशा दुर्घटना झाल्या आहेत. त्यांचे ऑडीट करुन दुरगामी उपाययोजना केल्या पाहिजेत. विशेषता: रसायन कंपन्यांचे युध्द पातळीवर फायर ॲण्ड सेफ्टी ऑडीट करावे आणि निदर्शनास येणा-या त्रुटी दुर करुन नियम मोडणा-यांवर कायदेशीर कारवाई करावी. मनपा क्षेत्राच्या बाहेरील भौगोलिक भाग हा पीएमआरडीए आणि एमआयडीसीचा आहे. त्यांच्याकडेच यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही. याकडेही शासनाने लक्ष द्यावे.

उरवडे ,खारवडे, पिरगुट येथील स्थानिक कामगार या दुर्घटनेत मृत्यू पावले आहेत.कंपनी मध्ये कसलाही ले आऊट नव्हता. खूप कमी जागेत त्यांना काम दिलेले होते .कंपनी बेकायदेशीर चालवली जात होती त्यामुळे कंपनी मालकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा व मृत कामगारांच्या वारसांना कामगार नुकसान भरपाई कायद्यापेक्षा जास्त भरपाई देणेत यावी. त्या सर्वांवर परिवाराच्या उपजिविकेची मदार होती त्यांचा जीव गेल्यामुळे परिवार उघड्यावर पडले आहेत.कधीही न भरून येणारी हानी झालेली आहे.

शासनाची आर्थिक मदत तुटपूंजी आणि दिशाभूल करणारी आहे. यासाठी सरकारने १० लाख, कंपनी मालकाने २० लाखांची तातडीने मदत करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तेथील परिस्थितीची पाहणी मन सुन्न करणारी होती.
हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. नियम धाब्यावर बसवणा-यांना कडक शिक्षा झाली पाहिजे.
यावेळी दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *