रोहित खर्गे
विभागीय संपादक
मुंबई- ९ जून २०२१
मुंबईत मान्सून दाखल झाल्याची घोषणा हवामान खात्याच्या वतीने करण्यात आली आहे. मुंबईला रात्रभर पावसानं चांगलंच झोडपलं आहे. अजूनही हा पाऊस मुंबईच्या अनेक भागात सुरु आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरं म्हणजेच, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये दमदार पाऊस पडतोय. मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु असून अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत.
मुंबई शहर परिसरात आज सकाळी 7 ते 8 एका तासात 33 एमएम पाऊस पडला आहे. पूर्व उपनगरात 25 एम एम तर पश्चिम उपनगरात तुरळक पाऊस पडला आहे. समुद्राला 11.43 वाजता 4.16 मीटर उंच भरती येणार आहे. त्यावेळी मुंबईत अतिमुसळधार पाऊस सुरूच राहिला तर शहरातील सखल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई आणि उपनगात पावसाने खरोखरंच हजेरी लावली. मुंबई, उपनगर, ठाणे, नवी मुंबई, पनवेल या विभागांमध्ये पहाटेपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. सुरूवातीला पावसाचा जोर कमी होता पण नंतर मुसळधार पाऊस पडण्यास सुरूवात झाली.