उरवडे मुळशी येथे दुर्दवी घटना घडलेल्या कंपनी मध्ये जाऊन गृहमंत्री वळसे पाटील यांची भेट..

रोहित खर्गे
विभागीय संपादक

मुळशी- दि ८ जून २०२१
मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ स्यानिटायझर बनवणाऱ्या कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आग कशामुळे लागली, याला जबाबदार कोण यासाठीच्या चौकशीसाठी शासनाने समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त होईल. चौकशीचा प्राथमिक अहवाल प्राप्त होताच आगीचे कारण स्पष्ट होऊ शकेल, व आगीच्या चौकशी अहवालानंतर जबाबदारी निश्चित होईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीची पाहणी करण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासमवेत खा.सुप्रिया सुळे,आ.संग्राम थोपटे, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, श्री संतोष मोहोळ यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख,जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, स्थानिक लोकप्रतिनिधी, एमआयडीसीचे अधिकारी यांच्याकडून या दुर्देवी घटनेची माहिती घेतली.

यावेळी वळसे पाटील म्हणाले, या उद्योगात अनेक गोष्टी ज्वलनशील असल्याने आग सगळीकडे पसरली असून आगीचे कारण,जबाबदार कोण याबाबतची कारवाई, अहवाल आल्या नंतर होईल. प्राथमिक अहवाल आजच प्राप्त होईल. डीएनए टेस्ट करूनच मृतदेह ओळखता येतील त्याशिवाय ओळखता येणार नाहीत, यासाठी ससूनमध्ये दोन ते तीन दिवस लागू शकतात.

खा. सुप्रिया सुळे यांनीही रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच शासकीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *