आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
दि.8/6/2021
बेल्हे ग्रामपंचायतीने सुरू केले मैला उपसा यंत्र,शेतीसाठी खत म्हणून होणार मैंल्याचा वापर,अनेक शेतकऱ्यांची मागणी
बातमी:-विभागीय संपादक रामदास सांगळे,जुन्नर
बेल्हे (ता.जुन्नर) ग्रामपंचायतीच्या वतीने मैला उपसा यंत्र आज पासून कार्यान्वित करण्यात आले. यामुळे बेल्हे व परिसरातील गावांना याचा फायदा होणार आहे. अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेले मैला उपसा यंत्र मंगळवार (दि.८) रोजी कार्यान्वित करण्यात आले.मैला उपसण्यासाठी बेल्हे ग्रामस्थांसाठी २ हजार रुपये तर अंतर वाढल्यास इतर गावांसाठी अडीच हजार रुपये दर आकारला जाणार असल्याची माहिती गावचे सरपंच गोरक्षनाथ वाघ यांनी दिली. उपसलेल्या मैंल्याचा वापर शेतामध्ये खत म्हणून केला जाणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी यासाठी मागणी सुद्धा केली आहे.ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगातून हे यंत्र खरेदी केले आहे. बेल्हे गावचे सरपंच गोरक्षनाथ वाघ सरपंच झाल्यापासून त्यांनी सुरू केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आळे ग्रामपंचायतीकडे मैला उपसा यंत्र आहे परंतु त्यासाठी नागरिकांना खूप प्रतीक्षा करावी लागत होती. आता बेल्हे ग्रामपंचायतीने गावात मशीन उपलब्ध करून दिल्याने नागरिकांची प्रतिक्षा संपली असल्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.