५ जून पर्यावरण दिनानिमित्त : जंगली मेवा संकल्पनेतून वृक्ष लागवड : सणसवाडी ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम…

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
सणसवाडी : 05/06/2021.

सणसवाडी औद्योगिक परिसरामध्ये नरेश्वर मंदिर परिसरात, नरेश्वर मंदिर वनराई समिती आणि सणसवाडी ग्रामस्थांच्या वतीने, जंगली झाडांची लागवड केली जात आहे. २०१७ पासून या परिसरामध्ये, देशी झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड केल्याने, या भागात सर्वत्र हिरवेगार दृश्य दिसत असून, आरोग्यदायी वातावरण तसेच मुबलक ऑक्सिजनयुक्त वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे येथील नागरिकांचा, मोठ्या प्रमाणावर नरेश्वर मंदिराला भेट देण्याचा कल वाढलेला दिसतो आहे.

आज ५ जून पर्यावरण दिनानिमित्त, सणसवाडी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ आणि वनराई समितीच्या माध्यमातून अनेक झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. सन २०१७ पासून सुमारे ३००० झाडे लावून ती जगवण्यासाठी सणसवाडी ग्रामस्थ प्रयत्न करीत आहेत.

सणसवाडी ग्रामपंचायत च्या वतीने, या झाडांना बाराही महिने पाणी मिळण्यासाठी व विशेषतः उन्हाळ्यातही झाडे जगवण्यासाठी, पाईपलाईन केली असून, पशुपक्ष्यांना धान्य व पिण्याच्या पाण्याची सुविधा करून, श्रमदानातून या भागात हिरव्यागार वनराईत रूपांतर करण्यात येत आहे.

या ठिकाणी देखरेखीसाठी एका व्यक्तीची नेमणूक करण्यात आली असून, काही पर्यावरण प्रेमी आपल्या जन्मदिवसाच्या, लग्नाच्या वाढदिवसाच्या व इतरही काही निमित्ताने, झाडांचे रोपण याठिकाणी करत आहेत.

आज ५ जून म्हणजेच पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडितआप्पा दरेकर, सणसवाडी गावच्या सरपंच सुनंदा दरेकर, ग्रामपंचायत सदस्य स्नेहल भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य सागर दरेकर, राजेंद्र दरेकर, चिराग इंडस्ट्रीचे संभाजी उकिरडे, नवनाथ दरेकर, अर्जून सैद, विष्णू हरगुडे, सागर हरगुडे, मोहन हरगुडे, शिवाजी शिरोळे, अनिल दरेकर, अनिल गोटे, पोपट ढेरंगे या मान्यवरांनी श्रमदान करत वृक्षारोपण केले.

पुण्याच्या लगत असणाऱ्या या सणसवाडीमध्येही झपाट्याने सिमेंट काँक्रेटचे जंगल वाढत आहे. त्यामुळे सणसवाडी ग्राम पंचायत व सणसवाडीतील या वृक्षप्रेमींमुळे, भविष्यात येथे नैसर्गिक ऑक्सिजन निर्मितीचे ठिकाण जोर धरत आहे. हे पुढील पिढीसाठी खूप महत्वाचे काम ठरणार आहे.

कारण प्रत्येक संकट आपल्याला नविन काहीतरी शिकवून जाते. कोरोनानेही हेच शिकवलेय की, वृक्ष तोडू नका तर त्यांचे संवर्धन करा. कारण कोरोना काळात ऑक्सिजनची कमतरता भासलेली होती. त्यामुळे प्रत्येकाने योग्य ठिकाणी योग्य वृक्ष लावून, त्यांचे संवर्धन करणे हीच काळाची गरज बनलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *