खेडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी वाद …अजित पवार यांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा माज जिरवावा नाहीतर शिवसेनेकडे हा विषय सोपवावा – खासदार संजय राऊत यांचा इशारा…

खेड,दि.04/06/2021

बातमी – प्रतिनिधी,अक्षता कान्हूरकर, खेड

खेड पंचायत समितीतील शिवसेना सभापती भगवान पोखरकर यांच्यावर सोमवारी (दि. ३१) अविश्वास ठराव मंजूर झाला होता. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची भूमिका मांडण्यासाठी राऊत यांनी शुक्रवारी (दि. ४) खेडमध्ये जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांच्या पाडळी (ता. खेड) येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी चौफेर राजकीय टोलेबाजी केली.

खेड तालुक्‍यात पंचायत समितीच्या इमारतीवरून चाललेल्या राजकीय वाद आणि सभापतींवर गुन्हे दाखल केल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने खासदार संजय राऊत हे या घटनेची माहिती त्याबाबत निर्णय घेण्यासाठी खेडच्या दौऱ्यावर आले होते.
आम्हालाही माणसे फोडता येतात. आम्हीही फोडू शकतो. आघाडीमुळे आपण एका नियमाने तस वागल पाहीजे. बाळासाहेबांइतकीच श्रद्धा शरद पवार यांच्यावर पण आहे .राजकारणातील सहकारी दिवंगत नेते सुरेशभाऊ गोरे प्राचंड मतानी निवडून आले होते. अजीतदादांनी सांगीतले,मुख्यमंञी यांनी सांगीतले,तरी हे महाशय ऐकत नसेल तर यांना काय म्हणायचे असे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केले.

खेडचा विषय हा शिवसेना पक्षासाठी प्रतिष्ठेचा आहे. पालकमंत्र्यांनी येथील राष्ट्रवादीचे आमदार मोहिते यांचा बंदोबस्त करावा. मोहिते जर त्यांचेही ऐकत नसतील तर हा विषय शिवसेना स्टाईलने हाताळला जाईल. शिवसेनेने बांगड्या भरलेल्या नाहीत. आम्ही सत्तेसाठी लाचार नाही. सेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला तर शिवसैनिक सर्व बंधने झुगारून देतील असा सज्जड दम शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिला.

राऊत म्हणाले, खेड तालुक्‍याच्या राजकारणात दिलीप मोहितेंचा वारू नेहमीच उधळलेला असतो; मात्र शिवसेनेने बांगड्या भरलेल्या नाहीत. आमच्या स्वाभिमानाचा आणि अस्तित्वाचा प्रश्न येतो तेव्हा शिवसेना प्रतिष्ठेचा लढा लढते. वाघाच्या शेपटीवर पाय देणाऱ्याची गय केली जाणार नाही.

खेड पंचायत समितीच्या शिवसेनेच्या सभापतींना अटक झाल्यानंतर पोलीस काळा बुरखा घालून मीडियासमोर आणतात; मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलाने गोळीबार केला त्याला काळा बुरखा का घातला नाही. याची गंभीर दखल उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. त्या सदस्यांबाबत निर्णय घेतलाय. खेड पंचायत समिती सभापती यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी आणि तो केल्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत सहलीला गेलेल्या सदस्यांबाबत आणि डोणजे (पुणे) येथे झालेल्या गैरप्रकाराबाबत शिवसेनेकडून कायदेशीर प्रक्रिया सुरु केली आहे. शिवसेनेच्या त्या सदस्यांबाबत निर्णय आम्ही घेतला आहे. असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की पंचायत समिती ईमारत बांधकाम या विषयात स्वर्गीय आमदार सुरेश गोरे यांची भावनिक गुंतवणूक होती. एखाद्याच्या मृत्यूनंतर वैर संपते. मात्र विद्यमान आमदारांना माणुसकी नाही. ते घाणेरडे राजकारण करत आहेत. त्यांची शरद पवार यांच्या पक्षात राहण्याची लायकी नाही. त्यांनी खेडचा तमाशा करून ठेवला आहे, अशी परखड टीका राऊत यांनी केली.

खेड तालुक्यातील समस्या शरद पवार यांच्यापुढे मांडण्याचे सूतोवाच संजय राऊत यांनी यावेळी केले. जर मोहिते यांच्या वागण्याची तऱ्हा बदलली नाही तर पुढच्या वेळेस महाविकास आघाडी राहू अथवा न राहो पुढील काळात शिवसेनेचाच आमदार होणार असा थेट प्रहार त्यांनी मोहिते यांच्यावर केला. मतदान प्रक्रियेवर कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती राऊत यांनी दिली. अविश्वास ठरवावेळी शिवसेनेच्या विरोधात मतदान केलेले मच्छिंद्र गावडे यांनी आपली फसवणूक झाल्याचे सांगितले.

याप्रसंगी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हाप्रमुख माऊली कटके, जि. प. सदस्य बाबाजी काळे व तनुजा घनवट, पंचायत समिती सदस्य अमोल पवार, ज्योती आरगडे व मच्छिंद्र गावडे यांच्यासह रामदास धनवटे, प्रकाश वाडेकर, नितीन गोरे, विजया शिंदे, राहुल गोरे, ऍड. विजयसिंह शिंदे पाटील आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *