पै. मंगलदास बांदल यांचा जामीन नामंजूर : त्यांच्यावर फसवणुकीचा दुसराही गुन्हा दाखल…

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
शिरूर : दि. 02/06/2021

पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष पै. मंगलदास विठ्ठलराव बांदल यांच्यावर पुन्हा एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने, बांदल यांची कोठडी आणखी काही दिवस वाढलेली आहे.

या आधीच शिक्रापूर येथील दत्तात्रय मांढरे यांची आर्थिक फसवणूक, ही शिवाजीराव भोसले सह. बँकेच्या माध्यमातून केल्याच्या आरोपाखाली, पै. बांदल यांना अटक झाली होती. त्यात बांदल यांच्या पत्नी व विद्यमान जी. प. सदस्या रेखा मंगलदास बांदल व अन्य तिघांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे पै. मंगलदास बांदल यांना, कोर्टाने १ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले होते.
परंतु या पहिल्या गुन्ह्यातून सुटण्याआधीच, बांदलांवर दुसराही आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने, त्यांच्या पोलीस कोठडीत आणखी वाढ झाल्याने, त्यांची रवानगी आता पुणे येथील येरवडा कारागृहात केल्याचे समजतेय.

हा दुसरा गुन्हाही शिवाजीराव भोसले सह. बँकेच्या आर्थिक फसवणुकी बाबतचाच असून, तो रवींद्र सातपुते (राहणार जतेगाव बु || ता. शिरूर, जी. पुणे) यांनी दाखल केला आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार ते पुणे येथील शिवाजीराव भोसले सहकारी बँक, शाखा शिवाजीनगर येथे आजपर्यंत कधिही बँक कर्ज प्रकरणी गेले नसतानाही, त्यांच्या परस्पर मंगलदास विठ्ठलराव बांदल यांनी व त्यांच्यासह गुलाब दशरथ पवार (रा. शिक्रापूर, ता. शिरूर, जी. पुणे) व दिनेश जयसिंग कामठे (रा. जतेगाव, ता. शिरूर, जी. पुणे) या तिघांनी मिळून फिर्यादी रवींद्र सातपुते, रा. जातेगाव बु || ता. शिरूर यांच्या आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर कागदपत्रांचा वापर करून, कर्जप्रकरणावर फिर्यादी रवींद्र सातपुते यांच्या खोट्या सह्या करून, सदर कर्ज प्रकरणात सातपुते यांना जामीनदार दाखवून कर्ज काढून फसवणूक केल्याबाबतची फिर्यादीत म्हटलेले आहे.
त्यामुळे आता या बँकेचे अधिकारिही या प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
रवींद्र सातपुते यांच्या फिर्यादीवरून, बांदल यांच्यासह पवार व कामठे यांच्यावर भा. द. वि. कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, १२० ब अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *