शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे भावकीच्या शेतीच्या भांडणात तरुणाचा खून…
कवठे येमाई/शिरूर
दि. 31/05/2021
बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे


पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात भावकीच्या वादात, एक वीस वर्षीय तरुणाचा खून झालाय. ही घटना कवठे येमाई या गावात घडली आहे.
सविस्तर माहिती अशी की, कवठे येमाई येथील, येमाई मंदिराच्या मागच्या बाजूला म्हणजेच पश्चिमेकडे असलेल्या माळवदे वस्ती येथे, रविवार दि. 31 मे 2021 रोजी दुपारी दीड ते दोनच्या सुमारास, शेतीच्या जुन्या वादातून माळवदे कुटुंबियांमध्ये बाचाबाची झाली. तिचे रूपांतर हाणामारीत झाले व यात रवींद्र तुकाराम माळवदे, वय वर्ष 20, राहणार, माळवदे वस्ती, कवठे येमाई या तरुणाच्या डोक्यात कुऱ्हाडीचा वार झाल्याने त्याचा मृत्यू झालाय.
ही भांडणे एवढी जोरदार होती, की त्यात अनेकांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या असून, जखमींना शिरूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची फिर्याद मृत रविंद्र चे वडील तुकाराम खंडू माळवदे, वय वर्ष 50, रा. माळवदे वस्ती, कवठे येमाई, ता. शिरूर, जी. पुणे, यांनी दिली असून त्यांनी सांगितल्याप्रमाणे –
“दि. 31 मे 2021 रोजी दुपारी 1.30 ते 2.00 वा. चे दरम्यान, माळवदे वस्ती येथे शेतीच्या वादाचा राग मनात धरून, पांडुरंग बारकू माळवदे, या इसमाने कुऱ्हाडीचा वार तुकाराम खंडू माळवदे यांच्यावर करत असताना, तुकाराम यांचे मेहुणे बाबाजी विठ्ठल बगाटे यांनी हात मध्ये घालून तो हल्ला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात बाबाजी बगाटे यांना गंभीर जखम झाली. त्यानंतर लगेचच पांडुरंग माळवदे याने दुसरा वार माझा मुलगा रवींद्र तुकाराम माळवदे याच्या डोक्यामध्ये केला व त्यात रवींद्र चा मृत्यू झाला. तर, रवींद्र ची पत्नी योगीताच्या डोक्यावर, फक्कड दत्तू माळवदे ने कुऱ्हाडीने वार केला. भावजय बबूबाई मथु माळवदे हिच्यावर लहू व अंकुश माळवदे या दोघांनी लाकडी दांडक्याने मारले. माझा भाऊ मथु खंडू माळवदे यांच्यावर, पांडुरंग बारकू माळवदे याने डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. पुतण्या आकाश बाबुराव माळवदे याच्यावर अभिजित फक्कड माळवदे याने कुऱ्हाडीने वार केले तर, त्याच्यावरच सुदाम लक्ष्मण माळवदे व अंकुश बाबुराव माळवदे या दोघांनी लाकडी दांडक्यांनी मारले. माझी बहिण शोभा बाबाजी बगाटे हिस अभिजित फक्कड माळवदे याने कुऱ्हाडीने तर ताईबाई लक्ष्मण माळवदे, वर्षा पाटील माळवदे व पाटील लक्ष्मण माळवदे या तिघांनी लाकडी दांडक्यांनी मारले. असे फिर्यादीत तुकाराम खंडू माळवदे यांनी सांगितलेय. तर, त्यांनी पुढे असेही सांगीतलेय की, मला स्वतःला बाबुराव दत्तू माळवदे याने कुऱ्हाडीने मारले, तर शोभा फक्कड माळवदे, हिराबाई बारकू माळवदे व बाबु दत्तू माळवदे या सर्वांनी लाकडी दांडक्यांनी मारहाण केलीय. त्यामुळे पांडुरंग माळवदे व बाकीच्यांनी संगनमताने, माझ्या मुलाला ठार केलेय व आमच्या सर्वांना ठार मारण्याचा उद्देशाने खुनी हल्ला व मारहाण केलीय.”
त्यामुळे या सर्व हल्लेखोरांविरुद्ध, मयत रवींद्र माळवदे चे वडील तुकाराम खंडू माळवदे यांनी, 13 जणांवर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला आहे.
या सर्वांवर शिरूर पो. स्टे. गु. र. नं. 381/21 भा. द. वि. क. 302, 307, 109, 143, 147, 148, 149, 269, 189 म. पो. का. क. 135, साथीचे रोग प्रति का. क. 2, 3, 4 प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.
शिरूर पोलिसांनी तात्काळ काही आरोपींना अटक केली आहे –
1) पांडुरंग बारकू माळवदे
2) फक्कड दत्तू माळवदे
3) अभिजित फक्कड माळवदे
4) सुदाम लक्ष्मण माळवदे
5) पाटील लक्ष्मण माळवदे
यांना त्वरित अटक केली असून, उर्वरित आरोपीतांना अटक करायचे बाकी आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पो. अधीक्षक मिलिंद मोहिते, उप विभागीय पो. अधिकारी अनिल लांभाते यांच्या मार्गदर्शनाखाली, शिरूर पो. स्टे. चे पो. नि. प्रवीण खानापुरे, स. पो. नि. बिरुदेव काबूगडे, पो. उ. नि. पडळकर, सहा. फौज. नजीम पठाण, पो. कॉ. सुरेश नागलोत, पो. कॉ. करणसिंग जारवाल, पो. कॉ. प्रशांत खूटेमाटे, पो. कॉ. प्रवीण पिठले, पो. कॉ. आण्णा कोळेकर या पथकाने अवघ्या दोन तासांत काही आरोपितांना अटक केली आहे.
पुढील अधिक तपास स. पो. नि. बिरुदेव काबूगडे करत आहेत.