कोपरे मांडवे गावात स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना तातडीने राबवा : खा.डॉ.अमोल कोल्हे…

दि.२५ (प्रतिनिधी)

कार्यकारी संपादक किरण वाजगे आणि निवासी संपादक पवन गाडेकर

विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे पाणी टंचाई भेडसावणाऱ्या सांसद आदर्श ग्राम कोपरे मांडवे गावासाठी ‘स्वर्गीय मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना’ तातडीने राबविण्याची मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे.

सांसद आदर्श ग्राम योजनेत खासदार डॉ. कोल्हे यांनी कोपरे गाव दत्तक घेतले आहे. या गावात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या असून येथील महिलांना दूरवर पायपीट करत डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्यामुळे या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी राज्य शासनाच्या स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना कोपरे मांडवे गावात राबविण्यासाठी तातडीने प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आयुष प्रसाद यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोपरे मांडवे गावाच्या पिण्याच्या पाण्यासंदर्भांत सातत्याने बातम्या येत आहेत. मात्र गतवर्षीपासून सुरू झालेल्या कोविडच्या संकटामुळे जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक आराखड्यातील विकासकामांसाठीचा निधी कोविड रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी खर्च झाला.  त्यामुळे गतवर्षी खासदार डॉ. कोल्हे यांनी मागणी केलेला जर्मन तंत्रज्ञानावर आधारीत पाण्याच्या टाक्यांसाठीचा प्रस्ताव निधीअभावी प्रलंबित राहिला होता. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या वर्षी जिल्हा नियोजन निधीमधून जर्मन तंत्रज्ञानावर अाधारीत पाण्याच्या टाक्यांसाठी निधी देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी या टाक्यांची कामे सुरू होणे अपेक्षित आहे.

दरम्यान राज्य सरकारने विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे पाणी टंचाई भेडसावणाऱ्या जलजीवन मिशन अंतर्गत “स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना” राबविण्याचा आदेश जारी केला. हा आदेश जारी होताच खासदार डॉ. कोल्हे यांनी तत्काळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आयुष प्रसाद यांना पत्र पाठवून ही योजना राबविण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली. त्यामुळे कोपरे मांडवे गावाच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सुटण्याच्या दिशेने सुरुवात झाली आहे असे म्हणता येईल.

या संदर्भात खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, सांसद आदर्श ग्राम योजनेतील गाव दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच कोविडचे संकट उभे राहिले. आधीचा लॉकडाऊन आताची दुसरी लाट यामुळे मुळातच कोपरे गावाचा विकास आराखडा बनवण्याचे काम होऊ शकले नव्हते. आता विकास आराखडा बनवण्याचे काम सुरू होत आहे. त्यामुळे या आराखड्यानुसार भविष्यात विविध विकासकामे केली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुळात आपण सर्व सोयी असलेले गाव दत्तक घेतले नाही. आदिवासी भागातील कोपरे मांडवे गाव विकासापासून गेली अनेक वर्षे दूर असल्यानेच आपण हे गाव सांसद आदर्श ग्राम योजनेत दत्तक घेतले आहे. त्यामुळे या गावाचा विकास करण्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. केंद्र सरकारने ही योजना जाहीर केली. परंतु त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूदच केलेली नाही. त्यामुळे नियमित योजनांच्या माध्यमातून आपल्याला कोपरे गावाचा विकास करायचा आहे, हे लक्षात घ्यायला हवे, असे मत खा.कोल्हे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *