एक हात मदतीचा : कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना भाजपाचा ‘आधार’…आई-वडिलांचे छत्र हरलेल्या मुलांच्या शिक्षणाचे पालकत्व स्वीकारणार… भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची माहिती

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि २५ मे २०२१
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलांना भाजपा आता ‘आधार’ देणार आहे. संबंधित मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारणार आहोत, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली.
भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला केंद्रातील सत्तेत येवून येत्या ३० मे ला सात वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त भाजपा कार्यकर्त्यांनी कोणताही सोहळा न करता कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत अनाथ झालेल्या मुलांना दत्तक घेण्यासह रोजच्या भाकरीची चिंता करत असलेल्या गरिबांना मदत करावी, असे आवाहन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवड भाजपानेही पुढाकार घेतला आहे.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, येत्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ या आकाशवाणी कार्यक्रमाद्वारे देशाला संबोधित करणार आहेत. केंद्रातील सत्तेत भाजपाची सात वर्षे यशस्वी वाटचाल झाली आहे. मात्र, सध्या कोरोनाने देशात थैमान घातले आहे. देशावासीयांसाठी हा काळ अत्यंत कसोटीचा आहे. त्यामुळे कोणताही सोहळा न करता आम्ही सामाजिक उपक्रमांवर भर देणार आहोत.

स्वयंसेवी संस्था- संघटनांना आवाहन…
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनामुळे आई-वडिलांचा मृत्यू झालेल्या मुलांची माहिती घेण्यासाठी महापालिका प्रशासनाची मदत घेण्यात येईल. प्रभाग स्तरावर माहिती घेण्याबाबत पुढाकार घेण्यात येणार आहे. तसेच, स्वयंसेवी संस्था आणि संघटनांनी पुढे यावे. ज्यामुळे अनाथ झालेल्या मुलांना शैक्षणिकदृष्टया पालकत्व स्वीकारता येईल. यासह संबंधित मुलांना सर्वदृष्टीने आधार देण्याबाबत कार्यवाही करता येईल. यासाठी भाजपाचे संघटन सरचिटणीस अमोल थोरात (मो. +91 80870 23231 ) आणि प्रसिद्धी प्रमुख संजय पटनी (मो. +91 98222 17163) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *