शिरूरकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला, घोडनदीला पाणी आले – आमदार अशोक पवार यांचा पाठपुरावा…

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे

शिरूर
दि. 23/05/2021

शिरूर शहराला पिण्याचे पाणी सोडण्याबाबत कुकडी सिंचन प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता श्री. धुमाळ यांची शिरुर हवेलीचे आमदार ॲड् अशोक पवार यांनी दि.21/05/2021 रोजी भेट घेऊन निवेदन दिले होते.

शिरूर शहरातील पिण्याच्या पाण्याच्या सद्यपरिस्थिती संदर्भात शिरूर नगरपालिका सभागृह नेते व उद्योजक प्रकाशशेठ धारिवाल यांच्यासोबत देखील फोनवरून त्यांचे संभाषण झाले होते.
तत्पूर्वी शिरुर शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या के. टी. वेअर मधील पाणी साठा संपत आल्याचे, शिरुर नगरपालिका पाणी पुरवठा विभागाचे सभापती मुझफ्फर कुरेशी व शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष अँड. सुभाष पवार यांनी अनेकवेळा कॉल करून, आमदार अशोक पवार यांच्या निदर्शनास आणून दिले होते.

हा प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन अभियंता धुमाळ साहेब यांनी आमदार पवार यांना दि.21/05/2021 रोजी देऊन, लगेचच 22/05/2021 रोजी त्यावर कार्यवाही करून पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे आजरोजी घोडनदी ला पाणी येण्यास सुरुवात झालेली आहे.
तसेच शिरूर ग्रामीणचे सरपंच नामदेव जाधव यांनीही पाण्यासाठी खूप पाठपुरावा केला होता.
पाणी सोडण्यासंदर्भात आंबेगाव विदगसनसभेचे आमदार तथा गृहमंत्री दिलीप वळसे पा., आमदार रोहित पवार, आमदार अशोक पवार, आमदार निलेश लंके, माजी मंत्री बबनराव पाचपुते तसेच पुणे व नगर जिल्ह्यातील अनेक आजी माजी आमदार व विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, घोड नदीच्या पाणी प्रश्नाबाबत अनेक बैठका घेतल्या होत्या.
या सर्व लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे घोडनदीला अगदी वेळेत पाणी आल्याने, शिरूरकर आनंदी झाले आहेत.
परंतु शिरूर ग्रामिणला पाणीपुरवठा करणारा जुना बंधारा हा बुडीत बंधारा असल्याने, त्याची साठवण क्षमता खूप कमी आहे. त्यामुळे तेथे जास्त क्षमतेचा नवीन बंधारा होणे गरजेचे असल्याचे, सरपंच नामदेव जाधव यांनी आपला आवाज न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले.

कारण सध्या शिरूर ग्रामीण ची लोकसंख्या सव्वीस हजारांच्या जवळपास असून, ती शिरूर शहराच्या लोकसंखेच्या जवळ जवळ पोचली आहे. त्यामुळे पाणी साठवण क्षमता वाढविणे आवश्यक असल्याचे, शिरूर ग्रामीण ग्राम पंचायत व शिरूर नगर परिषद यांचे म्हणणे आहे.