ऐन कोव्हीडच्या काळातच शिरूर ग्रामीणचा पाणीपुरवठा बंद, लोकांना टँकरने पाणी घेण्याची वेळ..

बातमी :- विभागीय संपादक रवींद्र खुडे
शिरूर : दि. 21/05/2021

      सध्या शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत व पंचक्रोशीकरांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ही पाणीटंचाई ऐन कोव्हीडच्या काळात झाल्याने, स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला असून लोक त्यामुळे भयभीत झाले आहेत. शिरूरला पाणी पुरवणाऱ्या घोडनदी पात्रात, गेली आठ दहा दिवसांपासून पाणी नाही. त्यामुळे, शिरूर ग्रामीण ची पाणीपुरवठा योजना सुमारे आठ दिवस बंद असल्याने, लोकांना पाणी पुरवठा झालेला नाही. तर ऐन उन्हाळ्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी खालावल्याने, विहिरी व कुपनलिकांचेही पाणी कमी झालेय. त्यामुळे लोकांना खाजगी टँकर द्वारे पाणी विकत घ्यावे लागत असल्याने, या कोव्हिड च्या परिस्थितीत लोकांचे रोजगार बंद असताना आणखी खिशाला भुर्दंड पडत आहे.

      शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतची लोकसंख्या सुमारे पंचवीस हजार आहे. या ग्राम पंचायतच्या हद्दीत येणाऱ्या रामलिंग, रामलिंग रोड, बाबुराव नगर व अनेक वस्त्यांचा सार्वजनिक पाणीपुरवठा बंद असल्याने, लॉक डावूनच्या काळात लोकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.

    शिरूर ग्राम पंचयातला पाणी पुरवठा होणाऱ्या बुडीत बंधाऱ्याखालीच, शिरूर नगर परिषदेचा दुसरा बंधारा असून तो  कोल्हापूर टाईप बंधारा आहे, की ज्याच्यातून शिरूर शहराला पाणी पुरवठा केला जातोय. परंतु तो बंधाराही आटलाय. त्यातील केवळ डबक्यांमध्ये पाणी शिल्लक असून, दोन दिवसात तेही संपून जाईल अशी परिस्थिती आहे.

शिरूरकरांच्या या प्रश्नाबाबत आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, यांच्याकडे शिरूरकरांच्या पाण्याच्या या प्रश्नाबाबत, अनेक गावचे लोकप्रतिनिधी व नागरिकांनी व्यथा मांडलेली होती. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, शिरूर हवेलीचे आमदार ऍड अशोक पवार, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, तसेच नगर व पुणे जिल्ह्यातील अनेक पुढाऱ्यांच्या प्रयत्नांनी, कुकडी व डिंभे प्रकल्पातून पाण्याचे आवर्तन सोडण्याचे निर्देश दिले गेलेत. त्याप्रमाणे आता धरणातून पाणीही सोडलेय. परंतु ते पाणी मध्ये कुठेही न अडविता थेट शिरुरला येणे महत्वाचे आहे. जर मधल्या गावातील ग्रामस्थांनी त्यांच्या हद्दीतील कोल्हापूर बंधाऱ्यांना ढापे टाकून पाणी अडविले, तर मात्र शिरूर ग्रामीण व शहरवासीयांना, आणखी चार ते पाच दिवस पाणी मिळणार नाही. त्यामुळे, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी आता याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे.
       सुमारे साठ हजार लोकसंख्येच्या शिरूर व शिरूर ग्रामीणच्या लोकांचा पाणी प्रश्न त्वरित मिटविणे गरजेचे आहे. नाहीतर हाहाकार उडण्याची चिन्हे आहेत.

      या बाबत शिरूर ग्रामीणचे सरपंच नामदेव जाधव व ग्रामविकास अधिकारी बी बी शेळके यांनि आपला आवाज न्यूज नेटवर्कशी बोलताना, येथे त्वरित पाणी मिळण्याची आवश्यकता असल्याची वस्तुस्थिती मांडलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *