भाजी विक्रेत्या महिलेच्या मुलाचा प्रामाणिकपणा, नितीन भोसले यांनी पैसे व दागिन्यांची पर्स केली परत…

बातमी – विभागीय संपादक, रवींद्र खुडे,
शिरूर
दि. 19/05/2021

शिरूर शहर युवती काँग्रेस अध्यक्षा ज्योती हांडे यांचे, शिरूर बाजारपेठेतील मुंबई बाजार येथे दुकान आहे. दोन दिवसांपूर्वी, दुकानातील माल भरण्यासाठी त्या शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील घाऊक व्यापाऱ्याकडे गेल्या होत्या. खरेदी झाल्यानंतर आपल्या स्कुटीवरून त्या पुन्हा आपल्या दुकानी परतल्या. परंतु, स्कुटीवरून खाली उतरल्यावर स्कुटीला अडकवलेली पर्स स्कुटीला नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. पर्समध्ये ७ हजार रुपये, तीन ग्रॅमची सोन्याची अंगठी, महत्त्वाची कागदपत्रे तसेच मोबाईलही होता. त्यामुळे ज्योती हांडे चिंताग्रस्त झाल्या. त्यांनी लगेचच दुसऱ्या मोबाईल वरून, पर्समध्ये राहिलेल्या आपल्या मोबाईलवर संपर्क साधला. सुदैवाने समोरील व्यक्तीने कॉल स्विकारला. पलीकडून नम्रपणे बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज आला.

“काळजी करू नका ताई, तुमची पर्स मला सापडलीय, तुमचा पत्ता सांगा मी पर्स घरी आणून देतो, पर्स उचकलेली नाही, त्यातील तुमच्या सर्व वस्तू व्यवस्थितच असतील.”
असा दिलासा हांडे यांना त्या अनोळखी व्यक्तीने दिला. त्यामुळे हांडे यांचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर काही वेळातच त्या अनोळखी व्यक्तीने, हांडे यांची पर्स त्यांच्या घरी आणून दिली.

        अलीकडच्या काळात माणुसकी धर्म जोपासणाऱ्यांची संख्या कमी झालेली दिसतेय. मात्र अशा काही प्रामाणिक लोकांमुळेच हे जग टिकून आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया ज्योती हांडे यांनी आपला आवाज न्यूज नेटवर्कशी बोलताना दिली.

   सर्वसामान्य कुटुंबातील मात्र स्वावलंबी असणाऱ्या नितीन बळीराम भोसले, यांनी पर्स मधील वस्तू बघून लालसा न बाळगता, ज्याची पर्स आहे त्या व्यक्तीला ती परत करण्याचा उदात्त हेतू मनात ठेवला. शिरूरच्या बाजारात स्वाभिमानाने भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या आपल्या मातेच्या (सुमन भोसले) संस्काराची प्रचिती देत व माणुसकी धर्माचे पालन करीत, नितीन भोसले यांनी हांडे यांच्या घरी जाऊन पर्स त्यांच्याकडे सुपूर्त केली. नितीन यांची माणुसकी पाहून भारावलेल्या हांडे यांनी त्यांचा सत्कार करण्याची मनीषा व्यक्त केली. मात्र नितीन यांनी यास नम्रपणे नकार दिला. तुमच्या माणुसकीचा आदर्श इतरांनीही घ्यावा म्हणून सत्कार स्विकारावा अशी नम्र विनंती आदिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला काळ