दि. १८ मे २०२१
ठिकाण : वैष्णवधाम
प्रतिनिधी : लक्ष्मण दातखिळे
जुन्नर तालुक्यातील आदर्श गाव वैष्णवधाम येथे सायंकाळच्या वेळी आपल्या दोन मित्रांसमवेत फिरण्यासाठी गेलेल्या श्री. गोपाळ ज्ञानेश्वर पवार यांच्यावर बिबट्याने हल्ला केला.
पुणे जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांच्या वैष्णवधाम गावातील स्मशानभूमी जवळच्या रस्त्यावर मंगळवार दि. १८ मे रोजी संध्याकाळी ०७.३० च्या सुमारास बिबट्याने हा हल्ला केला. मित्र व स्वतः पवार यांनी प्रसंगावधान राखत आरडा ओरडा केल्याने बिबट्याने धूम ठोकली.
गोपाळ पवार यांच्या दंडाला बिबट्याने चावा घेतल्याने चार दात लागून खोलवर जखम झाली आहे. त्यांच्यावर जुन्नर येथील श्री छत्रपती शिवाजी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार घेऊन पुढील उपचारासाठी घोडेगाव येथे हलवण्यात आले.
सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता पूर्ण लॉकडाऊन आहे त्यामुळे बाहेर फिरता येत नाही. आणि त्यातच बिबट्याचा दातखिळेवाडी आणि वैष्णवधाम परिसरात वावर वाढल्याने तसेच आता तर मानवावरही असे हल्ले होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तत्काळ पिंजरा लावण्याची मागणी जि. प. सदस्या आशाताई बुचके व गावच्या ग्रामस्थांनी केली आहे.