भिवंडीतून प्रचंड मोठा स्फ़ोटकांचा साठा जप्त : ठाणे गुन्हे शाखा युनिट 1 ची कारवाई..

रोहित खर्गे
विभागीय संपादक

ठाणे – १८ मे २०२१

भिवंडीतून  ठाणे गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकानं मध्यरात्रीनंतर मोठ्या प्रमाणावर स्फोटकं जप्त  केली आहेत. हा स्फोटकांचा साठा एवढा मोठा होता, की तो पाहून अधिकाऱ्यांनाही धक्का  बसला. या प्रकरणी पोलिसांनी एका जणाला अटक केली आहे. स्फोटकांचा हा एवढा मोठा साठा अवैधरित्या साठवणं हे अत्यंत धोकादायक असल्याचं मत पोलिसांनी व्यक्त केलं आहे.

ठाणे गुन्हे शाखा युनिट 1 च्या अधिकाऱ्यांनी काही महत्त्वाची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्रीनंतर सुमारे दीड वाजेच्या सुमारास भिवंडी कारवली गांव इथं धाड टाकली. याठिकाणी असलेल्या मित्तल इंटरप्राइजेसच्या गोदामात स्फोटके असल्याची माहिती मिळाली होती. पण धाड टाकली असता त्याठिकाणचं चित्र पाहून सर्वानाच मोठा धक्का बसला. याठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्फोटकं होती की, त्यानं संपूर्ण भिवंडीच उडाली असती.

टाकेलेल्या धाडीमध्ये पोलिसांनी जवळपास 60 खोक्यांमध्ये जिलेटिनच्या तब्बल 12 हजार कांड्या जप्त केल्या. त्याचबरोबर 3008 डेटोनेटर्सदेखिल याठिकाणी भरून ठेवलेले आढळले. याबाबत माहिती मिळताच लगेचच BDDS अर्थात बॉम्ब शोधक आणि नाशक पथकालादेखील घटनास्थळी पाचारण करण्यात आलं होतं. याठिकाणी ही सर्व स्फोटकं अवैधरित्या साठवली होती. ती जप्त करून वाडा येथील सेफ हाऊस मध्ये ठेवण्यात आली आहेत.

पोलिसांनी या प्रकरणी 53 गुरुनाथ काशीनाथ म्हात्रे यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयानं 22 मेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. म्हात्रे व्यवसायानं खाणी आणि बिल्डिंग मटेरियल सप्लायर आहेत. त्यासाठी त्यांनी हा माल साठवला असल्याची शक्यता वर्ताविण्यात येत आहे. मात्र हा माल अनधिकृतरित्या साठा करून ठेवला असल्याने त्यांच्यावर संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी ही माहिती दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा करून ठेवणं धोकादायक असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *