बातमी – रवींद्र खुडे, विभागीय संपादक, शिरूर
शिरूर :
दि १८ मे २०२१
सेवानिवृत्त पोलिस ज्ञानदेव गुलाबराव तनपुरे (वय ६८, रा. सुभाषनगर, धानोरी, पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीनुसार, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती पै. मंगलदास बांदल व त्यांचे बंधू बापूसाहेब बांदल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की,
तनपुरे हे सध्या धानोरी, पुणे येथे वास्तव्यास असून, सणसवाडी येथे त्यांची दोन एकर शेत जमीन आहे. त्या जमिनीला तार कंपौंड असतानाही, ते तोडून जबरदस्तीने तनपुरे यांच्या जमिनीतून पाण्याचा टँकर घालून, त्यांच्या विहिरीतील पाणी टँकरद्वारे चोरून व जमिनीचे नुकसान केले असून याबाबत विचारणा केली असता, जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे तक्रार दारांनी यात नमूद केलंय.
यावेळी टँकर क्र. MH 04, DD 4846 याद्वारे पाणी चोरून, विहिरीतून पाणी नेत असल्याने, तनपुरे यांचा मुलगा कैलास, यांनी बांदल यांना फोनवरून या बाबत विचारले असता, आमचे दररोज सहा टँकर येथून पाणी भरून घेऊन जातील, आडकाठी घातली तर हातपाय काढून टाकू अशी धमकी तनपुरे कुटुंबियांना दिल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे.
सतत या ना त्या कारणाने चर्चेत असणाऱ्या बांदल यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.
या तक्रारीनुसार, शिक्रापूर पोलिसांनी पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास विठ्ठलराव बांदल व त्यांचे बंधू बापूसाहेब विठ्ठलराव बांदल व त्यांचा टँकर चालक (सर्व रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस उपनिरीक्षक किरण भालेकर हे करत आहेत.