कोरोनाने आई-वडील हिरावलेल्या अनाथ मुलांसाठी वात्सल्य योजना राबवा, त्यांच्या मोफत शिक्षणाची सोय करा; आमदार लक्ष्मण जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी, दि. १७ मे २०२१
कोरोनामुळे एकाच कुटुंबातील पती व पत्नी दगावल्यामुळे त्यांच्या मुलांच्या डोक्यावरील छत्र हरवले आहे. राज्यातील अशी अनेक लहान मुले अनाथ झाली आहेत. अशा अनाथ मुलांसाठी राज्य सरकारने वात्सल्य योजना राबवून त्यांना जगण्याचे बळ द्यावे, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेल केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे राज्यातील अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. एकाच कुटुंबातील पती आणि पत्नी दोघेही दगावले आहेत. पती-पत्नी दगावल्याने त्यांची उघड्यावर आली आहेत. कोरोना महामारीने शेकडो लहान मुलांच्या डोक्यावरील छत्र हिरावून घेतले आहे. आई-वडील गमावल्यामुळे अनाथ झालेल्या मुलांचे भविष्य अंधकारमय झाले आहे.

या अनाथ लहान मुलांना सामाजिक दायित्व म्हणून आधार देणे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. अशा लहान मुलांना शासनाने “वात्सल्य योजने”अंतगर्त मोफत शिक्षण व वयाच्या १८ व्या वर्षांपर्यंत दरमहा पाच हजार रुपये आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. जेणेकरून अशा अनाथ मुलांचे जगणे सुसह्य होईल व त्यांच्या जीवनाला उभारी मिळेल.

“वात्सल्य योजने” अंतर्गत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील अनाथ मुलांना मोफत शिक्षण व आर्थिक मदत देणेबाबत शासन स्तरावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी संबंधितांना योग्य ते कार्यवाहीचे आदेश आपण द्यावेत आणि त्याची सरकारने अंमलबजावणी करावी, मागणी त्यांनी केली आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *