रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी, दि.१५ मे २०२१ – कोरोना रुग्णांना उपचार करण्याबरोबरच त्यांचे मनोधर्य वाढवून मानसिक स्वास्थ्य मजबूत होण्यासाठी महापालिकेने रुग्णांना व्हिडीओ कॉलद्वारे थेट नातेवाईकांशी संपर्क साधण्याकरीता हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. त्यामुळे रुग्ण तंदुरुस्त होण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होईल. असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
कोरोना बाधित रुग्णांशी आज महापौर माई ढोरे, उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील यांनी व्हॉट्सअप व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. या उपक्रमाविषयी माहिती देताना महापौर माई ढोरे बोलत होत्या.
महापौर माई ढोरे म्हणाल्या कोवीड रूग्णालयात दाखल असणाऱ्या रूग्णांना त्यांचा आप्तेष्टांशी संपर्क होत नसल्यामुळे रुग्णांमध्ये नैराश्य येण्याची शक्यता असते. ते नैराश्य दूर करण्यासाठी कुटूंबियांशी व्हिडीओ कॅालींगद्वारे संवाद साधल्यामुळे उर्जा निर्माण होवून रूग्ण बरा होण्यास मदत होते.ही बाब लक्षात घेवून हा उपक्रम नेहरूनगर येथील जम्बो कोवीड सेंटर मध्ये सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे या आजारातून कोविड रुग्ण लवकरात लवकर बरे होतील असा आशावाद महापौर माई ढोरे यांनी व्यक्त केला.
या उपक्रमात तीन व्यक्तीच्या पथकाद्वारे हा उपक्रम राबविण्यात येणार असून प्रथम कोरोनाबाधित रुग्णाजवळ जावून त्यांची नातेवाईकांशी बोलण्याची इच्छा विचार घेतली जाणार आहे. लॅपटॉप मार्फत रुग्णांचे थेट चित्रीकरण रुग्णांचे नातेवाईकांस त्यांच्या मोबाईलवर दिसणार आहे, त्यामुळे त्यांना एकमेकांशी लाईव्ह संवाद साधणे शक्य होणार आहे.
आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या संकल्पनेतून कोरोना रुग्णांचा नातेवाईकांशी संवाद हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून त्याचे नियोजन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे करीत आहेत.