रोहित खर्गे
विभागीय संपादक
पुणे- दि १४ मे २०२१
महापौर माई ढोरे यांनी उपमुख्यमंत्र्याच्या बैठकीत म्युकर मायक्रोसीस पुनर्तपासणीची केली मागणी.कोविड रुग्ण बरे झाल्यानंतर संभाव्य म्युकर मायक्रोसीस या रोगाच्या अनुषंगाने रुग्णांची पुनर्तपासणी करण्याकरीता उपाययोजना करणेबाबत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना विनंती केली आहे.
पुणे विभागीय कार्यालय येथे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली साप्ताहिक आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान महापौर ढोरे यांनी ही मागणी केली.
महापौर माई ढोरे म्हणाल्या सध्या शहरामध्ये लसींचा तुटवडा भासत आहे, कोरोना संसर्गाची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली गेली आहे. त्यामध्ये लहान मुलामुलींना धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. त्या अनुषंगाने १८ वर्षाखालील मुलामुलींच्या पालकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण होणे गरजेचे आहे. भविष्यात तिस-या लाटेमध्ये कोरोना संसर्गाची लहान मुलांना बाधा झाली तर त्यांच्या पालकांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण झाले आहे का असा प्रश्न रुग्णालयीन यंत्रणेकडून उपस्थित केला जाऊ शकतो.
अशा परिस्थितीत सावधानता बाळगण्याची गरज असून शहरातील १८ वर्षाखालील मुलामुलींच्या पालकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण झाल्यास कोरोन संक्रमणाचा प्रादुर्भाव नियंत्रित ठेवता येणे शक्य होईल. त्यामुळे या मागणीकडे आवर्जुन लक्ष द्यावे असेही महापौर माई ढोरे यावेळी म्हणाल्या