स्थानिकांना लसीकरणात प्राधान्य द्या. शिरुरचे आमदार अशोक पवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र..

बातमी – रवींद्र खुडे, विभागीय संपादक, शिरूर

शिरूर
दि. 12 मे 2021

सध्या लसीकरणाचा जो अविस्कळितपणा सुरू आहे, त्याच्या अनेक तक्रारी लोकप्रतिनिधींकडे लोक करत आहेत. लोकांच्या अनेक तक्रारी आमदार, खासदार व मंत्री महोदयांकडे दररोज जात आहेत. विशेषतः स्थानिकांना प्राधान्य मिळावे हा आग्रह लोकांचा आहे.

 त्याच पार्श्वभूमीवर, शिरूर हवेलीचे आमदार ऍड अशोक रावसाहेब पवार, यांनी या लसीकरणामध्ये सुसूत्रता यावी यासाठी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र दिले आहे. त्यात अनेक गोष्टींचा उहापोह केलेला आहे.

त्यात असे म्हटले आहे की, —
“महोदय, उपरोक्त विषयानुषंगाने सध्या केंद्र सरकार कोविड लसीकरणाचा कार्यक्रम राबवित आहेत. केंद्र सरकारच्या कोविन ऍप द्वारे कुठलाही व्यक्ती कुठेही जाऊन लस घेऊ शकतो. ग्रामीण भागातील अनेक व्यक्ती अशिक्षित असून त्यांना ऑनलाइन ऍप वापरता येत नसून तितकेसे ज्ञान त्यांना नाही. त्यामुळे शहरातील अनेक व्यक्ती येऊन शिरूर – हवेलीतील छोट्या गावात लसीकरण करून घेत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील सामान्य लोकांवर अन्याय होत आहे.
तरी या संदर्भात महाराष्ट्र सरकारने राज्यापुरते ऍप केंद्राच्या परवानगीने तयार करून घेऊन लसीकरण सत्र सुरू करण्याचे अधिकार तसेच कार्यक्षेत्रातील लसीकरण लाभार्थींसाठी कार्यक्षेत्र निवडण्याचा अधिकार मा. जिल्हाधिकारी सो. यांच्या अधिपत्याखाली देण्यात यावेत. प्रत्येक तालुक्याकरिता वेगळा कोड ठेवला तर त्या तालुक्याला न्याय मिळेल. तरी या संदर्भात ऍप मध्ये बदल करणे बाबत आपल्या वतीने केंद्र सरकारला विनंती करावी. ही विनंती”

अशा आशयाचे पत्र आज दि १२ मे २०२१ रोजी, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

  शिरूर शहरामध्ये होत असलेल्या लसीकरणावेळी, लोकांची प्रचंड गर्दी व तुलनेत लसींचा कमी पुरवठा, यामुळे आरोग्य कर्मचारी व लोकांमध्ये बाचाबाची व भांडणे होत आहेत. मध्यंतरी लसींचा पुरवठा होत नसल्याने, अनेक लोक लसीकरणाची वाट बघत होते. ज्यावेळी लसींचा पुरवठा होऊ कागला, त्यावेळी लोकांची तोबा गर्दी होऊ लागली. परंतु कधी कमी तर कधी जास्त लस उपलब्ध होत असल्याने, आरोग्य विभागाला नेमके नियोजन कसे करावे हे कळेनासे झाले होते. 

त्यामुळेच जर दररोज येणाऱ्या लसींची संख्या ही पुरेशी व शिरूर शहराच्या मोठ्या लोकसंख्येला गृहीत धरून पुरवठा झाला, तर यंत्रणेवर ताण येणार नाही व नियोजन चांगले करता येईल असे शिरूरकरांचे म्हणणे आहे.

 एकंदरीत, सर्वच शिरूरकर कोव्हिड लसीकरणाची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहात असून, लसीकरणाच्या अनियोजनामुळे व अनियमिततेमुळे पुरता मेटाकुटीला आला असून, अनेक फ्रंट लाईन वर्कर्सला देखील लसीचा दुसरा डोस अजूनही मिळालेला नाही. त्यामुळे प्रथम दुसरा डोस पूर्ण करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत व त्यानंतरच पहिल्या डोसला प्राधान्य द्यावे असे नागरिकांचे म्हणणे आहे.

   एकंदरीतच या व अशाप्रकारच्या अनेक तक्रारी, प्रसार माध्यमांकडे लोक करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *