(बातमी – रवींद्र खुडे, विभागीय संपादक, शिरूर)
शिरूर
दि. १२ मे २०२१
सध्या देशभर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. परंतु त्यात सुसूत्रता नसल्याचे चित्र सर्वत्रच दिसून येत आहे. शिरूर येथेही स्थानिक नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे. कारण अनेक लोक बाहेर गावाहून शिरूर येथील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी येत आहेत. तसेच लस पुरवठाही नियमित नसल्याने, लोकांची येथे भांडणे व बाचाबाची होत आहे. त्यामुळे, येथील आरोग्य विभागावर प्रचंड ताण येत आहे. लसींचा तुटवडा असल्याने येथील आरोग्य कर्मचारी टोकन नंबर देत आहेत. परंतु हे टोकन घेण्यासाठी लोक रात्रीपासूनच येथे नंबर ला बसून असल्याचे विदारक चित्र, शिरूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दिसून आलेय.
सुरुवातीला ४५ वर्ष वयोगटाच्या पुढील लोकांना लसिमध्ये प्राधान्य होते. परंतु नंतर मात्र १८ वर्ष ते ४४ वर्ष वयोगटातील लोकांनाही लस देण्याचे शासनाने जाहीर केले. आणि त्यामुळे आणखीनच गर्दी लसीकरण केंद्रांवर होऊ लागली.
सध्या केंद्र शासनाने जे ऍप तयार केलंय, त्याद्वारे कुणीही कुठेही रजीस्ट्रेशन करत आहे. त्यामुळे स्थानिकांना मात्र त्यामुळे तोटा होत आहे. काल तर शिरूर येथे पुण्याहून चक्क २ परदेशी पाहुणे आले व लस घेऊन गेलेत.
स्थानिकांना प्राधान्य मिळावे यासाठी शिवसेनेचे जिल्हा संघटक व शिरूर नगर परिषदेचे नगरसेवक संजय देशमुख, यांनी शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ तुषार पाटील, यांना बुधवार दि. १२ मे २०२१ रोजी शिवसेनेच्या वतीने निवेदन दिले आहे. यावेळी त्यांच्या समवेत शिरूर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष व नगरसेवक मुजफ्फर कुरेशी, शिक्षण मंडळाचे माजी सभापती संतोष शितोळे, तुकाराम खोले, शिवसेनेचे शहर प्रमुख मयूर थोरात, उपप्रमुख सुरेश गाडेकर, माजी शहर प्रमुख सुनील परदेशी, संतोष पवार, सागर नरवडे, शुभम माळी उपस्थित होते.
या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, --
"महोदय, आपल्या आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण सुरू असून, ऑनलाइन पद्धतीने लसीकरण सुरू आहे. ऑनलाइन पद्धतीमुळे स्थानिक नागरिकांना लस घेण्यासाठी अडचण येत आहे. ग्रामीण भाग व इतर अडचणींमुळे सर्वांना ऑनलाइन पद्धतीमुळे नोंदणी करणे शक्य होत नाही. या कारणास्तव स्थानिक नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहेत. तरी स्थानिक नागरिकांसाठी आरोग्य केंद्रावर योग्य वाटा मिळावा ही आमची आग्रहाची मागणी आहे. त्याचप्रमाणे, केंद्र सरकारच्या या धोरणाचा आम्ही निषेध करत आहोत व सर्वांसाठी लसीकरण खुले करावे ही मागणी करत आहोत"