(बातमी – रवींद्र खुडे, विभागीय संपादक)
शिरूर :
दि. ११ मे २०२१
शिरूर पोलीस स्टेशन गु.रजि.नं. 59/2021, भा.दं.वि.कलम 307,143,147,148,149, 341, 120(ब), 109, आर्मस् अॅक्ट कलम 3,4,25,27, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम कलम 3(1)(पप), 3(4) या गुन्हयातील फिर्यादी प्रविण गोकुळ गव्हाणे यास, NK साम्राज्य टोळीतील गोपाळ संजय यादव, शुभम सतिश पवार, अभिजीत उर्फ जपानी कृष्णा भोसले, शुभम विजय पांचाळ, निशांत भगवंत भगत, अदित्य औदुंबर डंबरे, शुभम उर्फ बंटी किसन यादव, राहुल अनिल पवार, महेंद्र येवले, निलेश उर्फ नानु चंद्रकांत कुर्लप, गणेश चंद्रकांत कुर्लप, मुकेश उर्फ बाबु चंद्रकांत कुर्लप, यांनी कट करून भररस्त्यात सायंकाळचे वेळी गोळीबार करून व कोयत्याने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.
त्यामध्ये एन. के. साम्राज्य टोळीचा म्होरक्या निलेश उर्फ नानु चंद्रकांत कुर्लप हा गुन्हा केल्यापासून फरार राहीला होता.
गुन्हयाचे तपासादरम्यान सदर टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.
सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने, गुन्हयातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करणेकामी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते (बारामती विभाग), दौंडचे उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, यांनी पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट स्थानिक गुन्हे शाखा (LCB) पुणे ग्रामीण, यांना सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार पो. नि. पद्माकर घनवट यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील स. पो.नि. सचिन काळे, पो. ना. राजु मोमीन, पो. ना. अजित भुजबळ, पो. ना. गुरू जाधव, पो. ना. मंगेश थिगळे यांचे पथक तयार केले होते.
सदर गुन्हयाचे समांतर तपासात असताना निलेश उर्फ नानु चंद्रकांत कुर्लप, हा दिल्ली येथे पळून जावून लपून बसला आहे अशी गोपनीय बातमीदारांकडून बातमी मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा पथकाने एन. के. साम्राज्य टोळीचा म्होरक्या निलेश उर्फ नानु कुर्लप यास दिल्ली येथून ताब्यात घेवून, पुढील कार्यवाही करीता शिरूर पोलीस स्टेशन येथे हजर केलेले आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास दौंड विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल धस हे करीत आहेत.
आरोपी नामे निलेश उर्फ नानु चंद्रकांत कुर्लप, रा. कामाठीपुरा, शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे, याचेविरूध्द दाखल गुन्हयांची माहीती खालीलप्रमाणे :-
1) शिरूर पोलीस स्टेशन गु. रजि. नं. 188/2010, भा. दं. वि. कलम 324, 504, 506, 147, 148, 149.
2) शिरूर पोलीस स्टेेशन गु. रजि. नं. 33/2013, भा. दं. वि. कलम 307, 341, 141 142, 143, 147, 148, 504, 506.
3) शिरूर पोलीस स्टेशन गु. रजि. नं. 355/2013, भा. दं. वि. कलम 326, 143 147, 149, 504, 506.
4) शिरूर पोलीस स्टेशन गु. रजि. नं. 473/2014, भा. दं. वि. कलम 324, 143, 147, 148, 323, 506.
5) शिरूर पोलीस स्टेशन गु. रजि. नं. 97/2016, भा. दं. वि. कलम 324, 341, 323, 427, 504, 506, 143, 147, 148, 149.
6) शिरूर पोलीस स्टेशन गु. रजि. नं. 225/2016, भा. दं. वि. कलम 143, 147, 149, 506.
7) शिरूर पोलीस स्टेशन गु. रजि. नं. 440/2016, भा. दं. वि. कलम 324, 504, 506, 143, 147, 148, 149.
8) शिरूर पोलीस स्टेशन गु. रजि. नं. 514/2016, भा. दं. वि. कलम 302, 34, 120 (ब).
अशा अनेक गुन्ह्यांमध्ये पोलीस रेकॉर्डवर असणाऱ्या एका खतरनाक गुन्हेगारास पुणे LCB ने दिल्ली येथून अटक केली असून, या टोळीवर व त्यात सहभागी असणाऱ्यांवर, संघटित गुन्हेगारी अंतर्गत (मोक्का) कारवाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे या टोळीचा प्रमुख निलेश उर्फ नानु कुर्लप याच्यासह त्याच्या टोळीत त्याचे सख्ये भाऊ देखील असून, शिरूर शहरातील व इतर गावे व पुण्यातील अनेक मित्र, या टोळीत सामील असल्याने या सर्वांवर आता कडक कारवाई होणार आहे. तर पोलिसांच्या रडार वर आता या टोळीला व या सदस्यांना सहाय्य करणारे लोक व त्यांचे आणखी कोणत्या टोळीशी संबंध आहेत का ? याची सखोल चाचपणी होणार आहे.
याच टोळीने २०१६ मध्ये शिरुरचे तत्कालीन नगरसेवक महेंद्र मल्लाव यांची हत्या भर रस्त्यात व गजबजलेल्या बाजारपेठेत, दिवसाढवळ्या केली होती. तेव्हा पासून व त्या नंतरच्या अनेक गुन्ह्यांमध्ये या टोळीतील अनेक आरोपी फरार होते. मल्लाव यांचा भर दिवसा खून झाला ही बातमी त्यावेळी वाऱ्यासारखी पसरली होती. आणि त्यामुळे त्यांचा समाज, अनेक जिल्ह्यांतून शिरूर येथे एकवटलेला होता. त्यावेळी परिस्थिती खूप चिघळली होती. त्यामुळे शिरूर येथे पोलिसांमुळे छावणीचे स्वरूप आलेले होते. परंतु मल्लाव यांच्या सर्व समर्थकांनी यावेळी शासनास व पोलीस प्रशासनास चांगले सहकार्य केले होते. त्यावेळी शिरूर पोलीस स्टेशन चा कार्यभार, पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्याकडे होता.
पुण्याचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी केलेल्या या महत्त्वाच्या कारवाईमुळे, शिरूर शहरातील संघटित गुन्हेगारी आता संपुष्टात येईल व असे गुन्हे करणाऱ्यांना आता जबरदस्त चाप बसेल, अशी सर्वत्रच चर्चा सुरू असून, पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्रच कौतुक होत आहे.