रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी- दि ७ मे २०२१
‘कोरोना योद्धा’ म्हणून शहरातील विविध कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर, नर्स, सहकारी कर्मचारी कोविड संकट काळात योगदान देत आहेत. महापालिका कोविड डॅशबोर्डबाबत अनेक समस्या आहेत. महापालिका अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन समस्या सोडवणार आहोत, असे आश्वासन भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिले आहे.
भोसरी विधानसभा मतदार संघातील कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर, प्रतिनिधींची बैठक बुधवारी घेण्यात आली. यावेळी भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. प्रमोद कुबडे, नगरसेवक कुंदन गायकवाड, सागर हिंगणे, विकास डोळस, निखिल काळकुटे, डॉ. दीपक शिंदे, डॉ. संतोष मोरे, डॉ. निलेश खैरनार, डॉ. कष्णकांत मानकर, डॉ. दीपाली एकार्ड, डॉ. उंबरकर आदी उपस्थित होते.
महापालिका कोविड डॅशबोर्डवर दर्शवलेली माहिती व प्रत्यक्षात असणारी माहिती यात तफावत असते, अशी तक्रार यावेळी डॉक्टरांनी केली. यावर महापालिका सबंधित विभागाचे अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन समस्या सोडवण्यात येणार आहे. तसेच, कोविडच्या संकटकाळात डॉक्टर आणि सहकारी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार लांडगे सकारात्मक पुढाकार घेत आहेत. याबाबत डॉक्टर आणि प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले.
ऑक्सिजन तुटवडा कमी करण्याचे नियोजन…
यावेळी कोविड केअर सेंटरमधील ऑक्सिजनचा अचानक तुटवडा, इतर अडचणींबाबत ऑक्सिजन कंपनींच्या व्यवस्थापनांशी चर्चा करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर भोसरी मतदार संघातील ज्या हॉस्पिटलमध्ये अचानक ऑक्सिजनची कमतरता भासणार आहे. त्यांना तात्काळ ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करण्यात येईल. त्यासाठी भाजपाचे नगरसेवक मदत करतील, अशी माहिती आमदार लांडगे यांनी यावेळी दिली.