राजुरी येथे ख्वाजा गरीब नवाज आयसोलेशन सेंटर सुरू…

विभागीय संपादक रामदास सांगळे

राजुरी (ता.जुन्नर) येथे २५ बेडचे ख्वाजा गरीब नवाज आयसोलेशन सेंटर सुरू केले असून नुकतेच आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते उदघाटन पार पडले.
दारूल उलूम हिलालिया गरीब नवाज येथे संस्थेचे अध्यक्ष मुबारक भाई तांबोळी व हाजी गुलामनबी शेख यांच्या पुढाकाराने हे आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात आले असून यामुळे राजुरी गावातील सर्व धर्मीय नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राजुरी येथे मागील काही दिवसात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने बरेच ग्रामस्थ करोना बाधित झाले आहेत. कमी लक्षण असलेले किंवा लक्षण नसलेले रुग्ण हे घरीच विलगिकरणात राहून उपचार घेत असल्याने करोनाचा फैलाव अधिक होण्याची शक्यता गृहीत धरून ख्वाजा गरीब नवाज आयसोलेशन सेंटर तातडीने सुरू करण्यात येऊन समाजापुढे उत्तम आदर्श निर्माण केला आहे.त्यामुळे अशा रुग्णांना गावातच उपचाराची सोय झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.
आयसोलेशन सेंटर साठी राजुरी येथील डॉ संदीप काकडे व डॉ. शिंदे डॉ. स्वप्नील कोटकर हे रुग्णांचे उपचार करणार आहेत.
सदर आयसोलेशन सेंटर साठी आमदार अतुल बेनके यांच्या प्रयत्नातून २५ बेड्स व इतर साहित्याची मदत जुन्नर तालुका मित्र मंडळ, पुणे यांच्या वतीने करण्यात आली.
संकल्प बहुउद्देशीय युवा संस्थेचे मुख्य प्रवर्तक हाजी गुलामनबी शेख यांच्या विशेष प्रयत्नातून व सर्व पदाधिकारी यांनी पुढाकार घेऊन तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडील परवानगी प्राप्त केली तसेच लोकवर्गणीतून सुमारे ७० हजार रुपये किंमतीची औषधे आयसोलेशन सेंटर ला मदत म्हणून दिली. संकल्प अन्नपूर्णा केंद्रच्या वतीने रुग्णांना दोन वेळचे जेवण देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी मुसलमान जमाअत राजुरी चे अध्यक्ष जाकीर पटेल यांनी प्रास्ताविक करताना आमदार अतुल बेनके , दारूल उलूम हिलालिया गरीब नवाज चे विश्वस्त व पदाधिकारी, जुन्नर तालुका मित्र मंडळ , संकल्प बहुउद्देशीय युवा संस्थेचे मुख्य प्रवर्तक हाजी गुलामनबी शेख व सर्व पदाधिकारी तसेच सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
या प्रसंगी दिपक औटी , माऊली शेळके , सरपंच प्रिया हाडवळे, एम डी घंगाळे, मुबारक तांबोळी ,ग्राम पंचायत सदस्य शाकिर चौगुले,संकल्प चे अध्यक्ष कलीम पटेल ,सदर जाकीर पटेल, प्राध्यापक मेहबूब काजी, सादिक अतार आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *